रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरु (फोटो सौजन्य-X)
Raigad Boat Accident News in Marathi: रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. यासंबंधीची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. बुधवारी (२०) सकाळी ९ वाजता करंजा रिप्स येथे ही घटना घडली. दरम्यान, ही मासेमारी बोट गुजरातमधील असल्याचे समजते.
या घटनेची माहिती मिळताच, सीआयएसएफ आणि नौदलाच्या गस्त नौकाद्वारे बचावकार्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र अपघात कशामुळे झाला, बोटीवर किती खलाशी होते? जीवितहानी झाली आहे का? किती नुकसान झाले? याबाबत काहीही उघड झालेले नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वादळी हवामानामुळे मासेमारी बंद आहे, बोटीला समुद्रात परवानगी नाही आणि ती गुजरातमध्ये आहे. नेमके काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या घटनेसंदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्य परवाना विभाग, कस्टम, पोलीस यांनी घटनेसंदर्भात सखोल चौकशी करावी, अशी मागणी कोळी बांधवांकडून करण्यात येत आहे.
रायगडमधील या बोटीचा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. समुद्रातील खराब हवामान, तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणांमुळे ही घटना घडली असावी, असे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नौदल आणि स्थानिक प्रशासनाने याबाबत तपास सुरू केला असून, लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. स्थानिक मच्छीमारांनी सांगितले की, समुद्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी वारे आणि खराब हवामान आहे, ज्यामुळे मच्छीमारीसाठी धोका वाढला आहे.
या घटनेनंतर स्थानिक मच्छीमारांनीही बचावकार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी आपल्या छोट्या बोटी आणि साधनांचा वापर करून खलाशांना वाचवण्याचे प्रयत्न केले. प्रशासनानेही सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्या असून, हेलिकॉप्टर आणि इतर साधनांचा वापर करून बचावकार्य गतीमान केले आहे. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावरील मच्छीमार समुदायात या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे.
गेली ५ ते ६ दिवस उरण तालुक्यात व परिसरात जोरदार वादळ वारा व पाऊस सुरु आहे.वादळी वाऱ्यामुळे मोरा बंदरात आश्रयासाठी आलेल्या गुजराती मच्छीमार बोटीतून एक खलाशी बेपत्ता झाला आहे.भरतभाई डालकी (४४) असे या बेपत्ता खलाशाचे नाव आहे.गुजरात राज्यातील वेरावल येथील भरतभाई कचराभाई डरी यांच्या मालकीची भवानी गंगा नावाची मच्छीमार बोट वादळी हवामानाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षिततेसाठी मोरा बंदरात नांगर टाकून विसावली होती.