झोमॅटो, स्विगीला टक्कर देणार 'ही' कंपनी, लवकरच बाजारात उतरण्याची तयारी; अधिकाऱ्याचीही नियुक्ती!
सध्याच्या घडीला भारतात झोमॅटो आणि स्विगी या कंपन्या क्विक वाणिज्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामांकित कंपन्या आहेत. मात्र, आता या क्षेत्रात आणखी एक कंपनी उडी घेणार आहे. त्यामुळे आता क्विक वाणिज्य क्षेत्रातील बाजारात आणखी स्पर्धा निर्माण होणार असून, झोमॅटो आणि स्विगी या कंपन्यांसाठी मोठा स्पर्धक तयार होणार आहे. ॲमेझॉन असे या कंपनीचे नाव असून, कंपनीने भारतातील क्विक वाणिज्य क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी कंपनीकडून याबाबत तयारी सुरु झाली असल्याचे समोर आले आहे.
नववर्षात होऊ शकते सुरुवात
ॲमेझॉन ही ई-कॉमर्स कंपनी पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतीय बाजारपेठेतील क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करू शकते. नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय बाजारपेठेत क्विक कॉमर्स व्यवसाय सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी कंपनीने आपल्या टीममधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह म्हणुन नियुक्ती देखील केली आहे. असे असले तरी कंपनीकडून आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीने याबाबतच्या माहिती देणे नेहमीच टाळले आहे. मात्र, आता माध्यमांमध्ये सुत्रांच्या हवाल्याने क्विक कॉमर्सबाबत ॲमेझॉनची भूमिका गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा – शेअर बाजारात घोटाळा… झिरोधाचे सह संस्थापक नितीन कामथ यांचा एक्स वर खुलासा
निशांत सरदाना यांच्या नियुक्तीने माहितीला दुजोरा
विशेष म्हणजे उपलब्ध माहितीनुसार, ॲमेझॉन कंपनीने आपल्या क्विक कॉमर्स व्यवसायाची रूपरेषा तयार करण्याची जबाबदारी वरिष्ठ कार्यकारी निशांत सरदाना यांना दिली आहे. सरदाना ॲमेझॉन इंडियामध्ये पीसी, ऑडिओ, कॅमेरा आणि लार्ज अप्लायन्सेसचा व्यवसाय आधीपासून हाताळत होते. त्यामुळे ते ही जबाबदारी लिलया पेलतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान, निशांत सरदाना यांच्या जुन्या जबाबदाऱ्या आता रणजीत बाबू सांभाळणार आहेत. जे ॲमेझॉन इंडियाच्या वायरलेस आणि होम एंटरटेनमेंट व्यवसायाची जबाबदारी सांभाळत होते.
आधीच कार्यरत आहेत या कंपन्या
गेल्या काही काळात भारतातील क्विक वाणिज्य व्यापार क्षेत्राचा प्रभाव झपाट्याने वाढला आहे. इन्स्टंट डिलिव्हरी आणि त्याच दिवशी डिलिव्हरी यांसारख्या संकल्पना भारतीय ग्राहकांना खूप आवडल्या आहेत. स्विगी थ्रू इंस्टामार्ट आणि झोमॅटो थ्रू ब्लिंकिट सारख्या पारंपारिक अन्नपदार्थ वितरण कंपन्या आधीच या विभागात दाखल झाल्या आहेत. झेप्टो आणि बाय बास्केट देखील क्विक वाणिज्य व्यापारात कार्यरत आहेत. याशिवाय ॲमेझॉनची प्रतिस्पर्धी ई-कॉमर्स कंपनी फ्पिपकार्टने मिनिट्स लाँन्च करत, क्विक कॉमर्स सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. आता ॲमेझॉन देखील पुढील काही महिन्यांत या क्षेत्रात प्रवेश करणार आहे.