2 ऑक्टोबरचा No UPI Day रद्द! ( सौजन्य - सोशल मीडिया )
चांदनी चौकचे खासदार आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (सीएआयटी) सरचिटणीस, प्रवीण खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखालील सुमारे २० वरिष्ठ व्यापारी नेत्यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या बैठकीत २,००० रुपयांवरील UPI व्यवहारांवर प्रस्तावित ०.४०% MDR संदर्भात व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेल्या चिंतांवर चर्चा झाली. या बैठकीत महत्त्वापूर्ण चर्चा देखील झाली. त्यात उद्या होणाऱ्या No UPI Day मागे घेण्यात आला.
या प्रतिनिधी मंडळात विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे अनेक प्रमुख व्यावसायिक नेते होते. ज्यात महत्त्वाचं म्हणजे ऑल इंडिया कंझ्युमर प्रॉडक्ट्स फेडरेशन AICPDF चे अध्यक्ष धैर्यशील पाटील, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन AIMRA चे अध्यक्ष कैलाश लखियानी आणि ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे अध्यक्ष पंकज अरोरा यांचा समावेश होता.
प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या विधायक चर्चेनंतर आणि व्यावसायिक चिंता दूर करण्याच्या आश्वासनानंतर, AICPDF आणि AIMRA यांनी २ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित ‘ No UPI Day’ विरोधातला आपला विरोध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटनांनी यापूर्वी २ ऑक्टोबर रोजी यूपीआयचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते.
व्यापार संघटनांनी प्रस्तावित MDR च्या संभाव्य आर्थिक परिणामाचा मुद्दा उपस्थित केला. विशेषतः लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांवर त्यांनी विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, डिजिटल पेमेंटचा वेग कायम ठेवताना व्यवसायांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा टाकला जाऊ नये. पण व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले की डिजिटल पेमेंटला विरोध करण्याचा त्यांचा हेतू नाही. त्यांनी डिजिटल इंडिया मिशन आणि UPI च्या यशाला आपला पाठिंबा दाखवला आहे.
अर्थमंत्र्यांनी प्रतिनिधी मंडळाच्या चिंता ऐकून घेतल्या आणि सर्व हितधारकांच्या हिताचा विचार करून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याची सरकारची वचनबद्धता व्यक्त केली. व्यापार संघटनांनी आशा व्यक्त केली की सरकार आणि व्यापार संघटनांमध्ये पुढील संवाद सुरू राहील आणि UPI-संबंधित धोरणांसाठी एक अशी चौकट विकसित केली जाईल, जी डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकट करेल आणि व्यवसाय व MSME च्या हिताचे रक्षण केलं जाईल.
काय सांगता? YouTube कडून बंपर कमाई…GDP मध्ये 18000 कोटींचं योगदान; 9.6 लाख लोकांना मिळाला रोजगार






