24 तास आधीच पीएम मोदींनी सांगितले, कसा असेल देशाचा अर्थसंकल्प; वाचा... कोणत्या बाबींवर असेल फोकस?
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘मोदी 3.0’ सरकारचा पहिला अर्थसंकल्प उद्या 23 जुलै रोजी संसदेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सकाळी ११ वाजता संसदेत हा अर्थसंकलप मांडणार आहे. त्यासाठी सोमवारी (ता.२२) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू झाले. यावेळी पीएम मोदी यांनी 24 तास आधीच यावेळचा देशाचा अर्थसंकल्प कसा असेल? कोणत्या क्षेत्रावर सरकारचा भर असेल? याबाबत माहिती दिली आहे.
विकसित भारताचा अर्थसंकलप
देशाचा यावर्षीचा अर्थसंकल्प 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी असणार आहे. संसदेत पीएम मोदी यांनी म्हटले आहे की, यावेळचा अर्थसंकल्प हा विकसित भारताचा अर्थसंकलप असून, देशवासियांना हमी देतो की, तो पूर्ण करण्याच्या उद्देशाने आपल्याला पुढे जायचे आहे. देशाचा अमृतकालचा हा महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे. जो पुढील पाच वर्षांच्या कामाची दिशा ठरवणार आहे. पीएम मोदी यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होत असताना, 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्प असणार आहे.
2024-25 मध्ये ‘इतका’ राहणार देशाचा जीडीपी; संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर!
सादर करणार मजबूत अर्थसंकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हटले आहे की, केंद्रातील सरकार उद्या एक मजबूत अर्थसंकल्प सादर करेल. आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न केले. भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने अर्थव्यवस्था म्हणून समोर आली आहे. केंद्र सरकार सलग तिसऱ्यांदा ८ टक्के वाढीसह विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. सकारात्मक दृष्टीकोन आणि सातत्याने वाढणारी गुंतवणूक हा याचा पुरावा राहिला आहे.
काय असेल उद्याच्या अर्थसंकल्पात?
उद्या सादर होणाऱ्या देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये पगारदार वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत. सरकार कर सूट आणि कर स्लॅबमध्ये बदल करण्यावर भर देऊ शकते. याशिवाय आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कपातीची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात जाहीर केला जाऊ शकतो, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे. आर्थिक वर्ष 2014-15 पासून 1.5 लाख रुपयांवर कायम असलेली ही कपात या अर्थसंकल्पात 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अर्थसंकल्पीय आठवड्यात हे 8 IPO लॉन्च होणार; वाचा… शेअर बाजारात गुंतवणूक करावी की नाही?
सीतारामन यांचा सलग सातवा अर्थसंकल्प
दरम्यान, निवडणूक वर्ष असल्याने 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. देशात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. यावेळी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही आणि देशात एनडीए आघाडीचे सरकार असून यावेळच्या अर्थसंकल्पातून जनतेला या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. देशाच्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील हा सातवा वार्षिक अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचणार आहेत.