
दुग्ध उत्पादकांसाठी खुशखबर! वर्तुळाकार अर्थव्यवस्थेमुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा
India’s Dairy Product: देशात चक्रीय किंवा वर्तुळाकार अर्थव्यवस्था मॉडेलची अंमलबजावणी सुरू झाल्याने पुढील पाच वर्षांत देशातील दूग्ध उत्पादकांचे उत्पन्न सुमारे २० टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास केंद्रीय गृह व सहकारी मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. गुजरातमधील वाव-भ्राड जिल्ह्यातील सनदर गावात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बनास डेअरीशी संबंधित पशुपालकांना संबोधित केले.
दुग्ध क्षेत्रात वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचे यशस्वी मॉडेल विकसित केल्याबद्दल त्यांनी बनास डेअरीच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. बनासकांठा येथे होणाऱ्या खासदारांच्या बैठकीत देशभरात या वर्तुळाकार अर्थव्यवस्था मॉडेलची अंमलबजावणी करण्याची ठोस योजना जाहीर केली जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले. बनास डेअरीचे वर्तुळाकार अर्थव्यवस्था मॉडेल समजून घेण्यासाठी अनेक खासदार बनासकांठा येथे आले आहेत, असे शाह यांनी स्पष्ट केले.
जानेवारी २०२६ मध्ये, सर्व प्रमुख सहकारी डेअरींचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनास डेअरीला भेट देऊन डेअरीने हाती घेतलेले उपक्रम समजून घेतील, असेही त्यांनी सांगितले. “चीज आणि दही सारख्या नेहमीच्या दुग्धजन्य पदार्थाव्यतिरिक्त, अशी अनेक उत्पादने आहेत ज्यांना जगभरात मागणी आहे परंतु ती भारतात उत्पादित केली जात नाहीत. जर आपण या उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले तर दुग्ध उत्पादक अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात, असे शाह म्हणाले.
आमच्या सरकारने कृषी क्षेत्रासाठी तीन आणि दुग्ध क्षेत्रासाठी तीन सहकारी संस्था निर्माण केल्या आहेत. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की वर्तुळाकार अर्थव्यवस्थेमुळे पुढील पाच वर्षात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न २० टक्क्यांनी वाढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता चक्रीय अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे.
दुग्ध सहकारी संस्था शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करतात आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांची विक्री करतात, त्यातून मिळणारा नफा पुन्हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते. यामध्ये दुधाचे उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री या चक्रात कचरा कमी करणे आणि संसाधनांचा पुनर्वापर यावर भर दिला जातो. सहकारी संस्थांना आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी मदत केली जात आहे, ज्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. या मॉडेलमुळे हजारो लहान आणि मध्यम शेतकरी थेट जोडले जातात.