
फोटो सौजन्य - Social Media
फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्याने भारतातील चाहत्यांना मध्यरात्रीपर्यंत जागे ठेवलेच, पण त्याचबरोबर क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील ऑर्डर्सनाही मोठी चालना दिली. इन्स्टामार्टने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सामान्य रविवारच्या तुलनेत अंतिम सामन्याच्या रात्री उशिरा स्नॅक्स, झटपट जेवण आणि पेयांच्या ऑर्डर्समध्ये लक्षणीय वाढ झाली. चाहत्यांनी सामना सुरू होण्यापूर्वीच घरात पार्टीसाठी आवश्यक वस्तूंचा साठा केल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
इन्स्टामार्टच्या माहितीनुसार, आईस्ड टी आणि कोम्बुचाच्या विक्रीत तब्बल १४७ टक्क्यांनी वाढ झाली. चिप्स आणि नमकीन ही सर्वाधिक पसंतीची जोडी ठरली, तर सामना पाहताना वेळ वाया जाऊ नये म्हणून अनेकांनी इन्स्टंट नूडल्सची निवड केली. पॉपकॉर्न, केक आणि क्रीम बिस्किटांचीही मोठ्या प्रमाणावर मागणी नोंदवण्यात आली.
या सामन्याचा उत्साह केवळ मुंबई, दिल्ली किंवा बंगळुरूपुरता मर्यादित राहिला नाही. होसूर, तिरुनेलवेली, जोधपूर, सोनीपत, रुरकी, कोझिकोड, लोणावळा, पालक्काड, गुवाहाटी आणि बिलासपूर यांसारख्या शहरांमध्ये ऑर्डर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. त्यापैकी होसूरमध्ये तब्बल ४१.९ टक्के वाढ नोंदवण्यात आली. बंगळुरूमध्ये प्रति ऑर्डर सर्वाधिक खरेदी झाल्याने सामूहिक स्क्रीनिंगचा ट्रेंडही स्पष्ट झाला.
सामना सुरू झाल्यानंतरही ऑर्डर्सचा वेग कायम राहिला. विशेषतः रात्री १:३१ ते २:१५ या कालावधीत भुकेची सर्वात मोठी लाट पाहायला मिळाली. त्यामुळे चाहत्यांनी सामना पाहतानाच झटपट मिळणारे खाद्यपदार्थ आणि ताजेतवाने पेये मोठ्या प्रमाणात मागवल्याचे दिसून आले.
ललित मोदींना मोठा दिलासा; IPL 2009 FEMA प्रकरणात क्लीन चीट, 16 वर्षांनी मायदेशी परतणार
इन्स्टामार्टच्या या आकडेवारीवरून फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना हा केवळ क्रीडा सोहळा न राहता अनेक भारतीय घरांमध्ये मध्यरात्रीच्या वॉच पार्टीचे रूप धारण केल्याचे स्पष्ट झाले आहे. स्नॅक्स, पेये आणि रेडी-टू-ईट पदार्थांच्या वाढत्या मागणीने चाहत्यांनी या संस्मरणीय सामन्याचा आनंद घरबसल्या जल्लोषात साजरा केल्याचे चित्र समोर आले.