
‘प्रोजेक्ट महादेवा’च्या
मुंबईतील कूपरेज फुटबॉल मैदानावर झालेल्या सामन्यात प्रोजेक्ट महादेवाच्या मुलांच्या संघाने मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन स्तरावरील विजेत्या डॉन बॉस्को, माटुंगा यांच्या १४ वर्षांखालील संघावर ५–० असा दणदणीत विजय मिळवला. तर मुलींच्या संघाने महाराष्ट्र राज्यस्तरीय १५ वर्षांखालील WIFA विजेत्या संघाविरुद्ध १–१ अशी बरोबरी साधत उत्कृष्ट लढत दिली. या सामन्यांमध्ये खेळाडूंनी दाखवलेले तांत्रिक कौशल्य, सांघिक खेळ, शिस्त, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती हे सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि विशेष शिबिरांमधून झालेल्या त्यांच्या प्रगतीचे द्योतक ठरले.
U20 Asian Cup 2027: भारतीय फुटबॉलसाठी ऐतिहासिक दिवस! 20 वर्षानंतर Under – 20 आशियाई कपमध्ये पात्र
या युवा खेळाडूंच्या प्रवासात आणखी एक अविस्मरणीय क्षण जोडला गेला. प्रोजेक्ट महादेवाच्या खेळाडूंना ब्राझीलचे महान फुटबॉलपटू आणि फिफा विश्वचषक विजेत्या ब्राझील संघाचे कर्णधार काफू यांची भेट घेण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची विशेष संधी मिळाली. काफू यांनी या युवा खेळाडूंच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित केले. तसेच खेळाडूंना त्यांच्या हस्ते विशेष ‘Letter of Appreciation’ प्रदान करण्यात आले. जागतिक फुटबॉलमधील एका महान खेळाडूकडून मिळालेली ही कौतुकाची थाप मुलांसाठी प्रेरणादायी ठरली. यावेळी खासदार तथा WIFA अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि भारताचे दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंह उपस्थित होते. त्यांनीही युवा फुटबॉलपटूंशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रोजेक्ट महादेवाच्या आतापर्यंतच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करताना मित्रा (MITRA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांनी युवा खेळाडूंची कामगिरी ही प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध प्रशिक्षणाचे आश्वासक फलित असल्याचे मत व्यक्त केले.
या उपक्रमाचा उद्देश केवळ तात्कालिक विजय मिळवणे नसून, पाच वर्षांच्या कालावधीत व्यावसायिक प्रशिक्षण, शिक्षण, क्रीडा विज्ञान, स्पर्धात्मक सामने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवाच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वांगीण विकास करणे हा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि योग्य संधींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हे युवा खेळाडू भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली संकल्पित आणि पुढे नेण्यात येत असलेला ‘प्रोजेक्ट महादेवा’ हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील युवा फुटबॉल प्रतिभा शोधून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरासाठी घडविण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्याने, क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन; महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA); व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF); वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) आणि Enaball Sports यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रोजेक्ट महादेवाच्या पाच वर्षांच्या निवासी प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती कार्यक्रमामध्ये व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षणासोबत शिक्षण, क्रीडा विज्ञान, पोषण, शारीरिक व मानसिक क्षमता विकास, स्पर्धात्मक सामन्यांचा अनुभव, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल अनुभव यांचा समावेश आहे. या उपक्रमाचे दीर्घकालीन ध्येय स्पष्ट आहे — महाराष्ट्रातून अधिकाधिक दर्जेदार फुटबॉलपटू घडवून त्यांना भारतीय संघापर्यंत पोहोचण्याची सक्षम वाट निर्माण करणे आणि भारताच्या फिफा विश्वचषक २०३४ च्या स्वप्नाला बळ देणे.