(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Petrol-Diesel Price Hike: महागाईचा दणका सामान्यांना बसतो आणि तोही जोरदार. आताही नवीन आर्थिक वर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी, ग्राहकांना महागाईच्या ट्रिपल अटॅक सहन करावा लागत आहे. सुरुवातीला व्यावसायिक LPG आणि नंतर ATF च्या किमतींमध्ये वाढ झाली आणि आता त्यानंतर आता पेट्रोल डिझेलच्या जोरदार दणका बसणार आहे. प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम ग्राहकांच्या रोजच्या जीवनावर होणार आहे आणि परिणामी सामान्यांच्या खिशावर ताण पडणार आहे.
सरकारी मालकीच्या ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ या तेल कंपनीने दिल्लीमध्ये ‘XP100’ पेट्रोलची किंमत प्रति लिटर ₹११ ने वाढवली आहे. या वाढीमुळे, पेट्रोलची किंमत प्रति लिटर ₹१६० पर्यंत पोहोचली आहे. XP100 हा IOC चा १००-ऑक्टेन पेट्रोल प्रकार आहे, जो प्रामुख्याने उच्च श्रेणीतील आलिशान गाड्या आणि सुपरबाईक्समध्ये वापरला जातो. याव्यतिरिक्त, ‘Extra Green’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रीमियम डिझेलची किंमत प्रति लिटर ₹९१.४९ वरून आता ₹९२.९९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
मध्यपूर्वेत (Middle East) सुरू असलेल्या संघर्षा गेल्या महिनाभरापासून सुरुच आहे. ज्याचा परिणाम कच्च्या तेलाचा पुरवठा मर्यादित झाला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. किमती प्रति बॅरल $१२० च्या पातळीच्या जवळ पोहोचल्या होत्या आणि सध्या त्या प्रति बॅरल $१०४ च्या आसपास व्यवहार करत आहेत. तरीही नियमित पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
गेल्या आठवड्यात, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर ₹१० ची कपात केली होती. परिणामी, पेट्रोलवरील कर कमी होऊन प्रति लिटर ₹३ झाला, तर डिझेलवरील कर पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे या निर्णयाचा ग्राहकांना त्वरित कोणता दिलासा मिळेल असं वाटत असेल तर अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे; कारण हा निर्णय मुख्य म्हणजे तेल कंपन्यांसाठी घेण्यात आला आहे. याचा मुख्य उद्देश या कंपन्यांचं आर्थिक नुकसान भरून काढण्यास मदत करणे हा आहे. त्यामुळे दरांमध्ये कोणताही फरक पडणार नाही.
* व्यावसायिक एलपीजीच्या किमती ₹१९५.५ ने वाढल्या.
* एटीएफच्या किमतींनी पहिल्यांदाच प्रति किलोलिटर ₹२ लाखांचा टप्पा ओलांडला.
* प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत.
* दिल्लीमध्ये XP100 पेट्रोल प्रति लिटर ₹११ ने महाग झाले आहे.
यापूर्वी, तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किमती वाढवल्या होत्या. दिल्लीमध्ये, १९-किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ₹१९५.५ ने वाढली आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीतच, या सिलिंडरच्या किमतीत एकूण ₹३०० पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. त्याचप्रमाणे, देशात ATF ची किंमत प्रथमच ₹२ लाख प्रति किलोलिटरचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या सगळ्याचा फटका सामन्यांना बसणार आहे एवढं मात्र नक्की!






