
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
जेव्हा पैशांची चणचण भासते, तेव्हा अनेक लोक आपल्या खर्चाकडे आणि बँक खात्यातील शिलकीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, असं केल तर आपण आणखीनच मोठ्या संकटात सापडू शकतात. अशा वेळी, तुमचे उत्पन्न आणि प्रत्येक लहान-मोठा खर्च एका कागदावर स्पष्टपणे लिहून काढणे अत्यंत महत्त्वाचं असतं. जेव्हा सर्व तपशील कागदावर स्पष्टपणे मांडले जातात तेव्हा मनात राहिलेली गोंधळाची परिस्थिती पूर्णपणे निवळते आणि पुढे काय करायचे आहे, याबद्दलचा एक स्पष्ट मार्ग समोर येतो.
आर्थिक अडचणीच्या काळात, कोणते खर्च अत्यावश्यक आहेत आणि कोणते खर्च पुढे ढकलले जाऊ शकतात, यातील फरक ओळखणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. अशा परिस्थितीत, तुमच्या खर्चाचे दोन वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण करणं अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. घरभाडे, किराणामाल आणि विविध बिले जी अत्यावश्यक स्वरुपाची असतात अशा खर्चांना महत्त्व देणं आणि त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. याउलट, ‘ऐच्छिक’ खर्च जसे की बाहेर जेवायला जाणे किंवा विविध सबस्क्रिप्शन्स ज्यांची त्यावेळेत आवश्यकता नाही अशा गोष्टी पूर्णपणे थांबवता येतात किंवा त्यात बरीच कपात करता येते. हा दृष्टिकोन ठेवला आणि त्या पद्धतीने वागलं तर तुमच्या बजेटवरील ताण कमी करता येतो आणि बचतीसाठी अधिक वाव मिळतो.
तुमच्या उत्पन्नाचा काही भाग बाजूला काढून एक Emergency Fund तयार करण्याचा सल्ला दिला जातो. हा निधी एक आर्थिक सुरक्षा कवच म्हणून काम करतो; ज्यामुळे वैद्यकीय आणीबाणी किंवा अचानक उद्भवणाऱ्या इतर अनपेक्षित खर्चांपासून तुमचं संरक्षण होतं. आर्थिक तज्ञ असा सल्ला देतात की, तुमच्या राहणीमानासाठी लागणाऱ्या किमान सहा महिन्यांच्या खर्चाइतका निधी या निधीमध्ये जमा करून ठेवला पाहिजे.
जर तुमचे सध्याचे उत्पन्न तुमच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी पुरे पडत नसतील तर तुम्ही अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी पर्यायी मार्गांचा सक्रियपणे शोध घेणं गरजेचं आहे. ‘फ्रीलान्सिंग’ म्हणजे स्वतंत्रपणे काम करणे किंवा खाजगी शिकवण्या यांसारख्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. सुरुवातीला यातून मिळणारे उत्पन्न कदाचित कमी असू शकते, परंतु कालांतराने या प्रयत्नांचे रूपांतर उत्पन्नाच्या फायदेशीर संधींमध्ये होणार यात काही शंका नाही.
जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल, तर वरील सर्व घटकांचा विचार करून तुम्ही तुमचे नियोजन करणं गरजेचं आहे. त्यानंतर, थोडा संयम बाळगला पाहिजे. कोणतीही गोष्ट एका रात्रीत बदलत नाही. म्हणूनच, थोडा संयम बाळगणे अत्यावश्यक आहे.