
PayPal Layoffs in India: PayPalचा भारताला मोठा धक्का!
PayPal India layoffs 2026 News: नोकरी करणाऱ्यांसाठी पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या PayPal कंपनीने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कामावरून काढायला सुरुवात केली आहे. कंपनी भारतातील जवळपास एक चतुर्थांश म्हणजे २५% लोकांना घरी पाठवणार आहे. ही काही फक्त भारतातली गोष्ट नाहीये, तर कंपनी जागतिक पातळीवरच स्वतःमध्ये बदल करत आहे. AI चा वापर वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार PayPal चे भारतात सुमारे ६७०० कर्मचारी काम करतात. त्यातले २५% म्हणजे जवळपास १६०० ते १७०० लोकांना एकतर काढलं गेलं आहे किंवा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यावर PayPal च्या प्रवक्त्याने सांगितलं की, “आम्ही आमच्या कंपनीत मोठा बदल करत आहोत. आमचं काम सोपं करण्यासाठी, कामाचा वेग वाढवण्यासाठी आणि कंपनीला भविष्यात वाढवण्यासाठी हे बदल गरजेचे आहेत. असे निर्णय घेणं कधीच सोपं नसतं. आमच्या कर्मचाऱ्यांवर याचा काय परिणाम होतो हे आम्हाला माहिती आहे.आम्ही त्यांना या काळात मदत करू.” पण भारतात नक्की किती लोकांना काढलं यावर त्यांनी स्पष्ट आकडा सांगितला नाही. PayPal Layoffs in India:
मे २०२६ मध्ये आलेल्या बातम्यांनुसार PayPal पुढच्या काही वर्षात जगभरातील आपल्या २०% कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. याचा फटका जवळपास ४७६० पदांना बसणार आहे.कंपनीच्या रिपोर्टनुसार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत PayPal मध्ये जगभरात २३८०० लोक काम करत होते. त्यातले ४१% लोक अमेरिकेत होते आणि बाकीचे इतर देशातले होते. निम्मे कर्मचारी म्हणजे ४९% लोक टेक्नॉलॉजी विभागात काम करतात.
PayPal ची भारतात दोन मोठी ऑफिस आहेत.एक चेन्नईला तर दुसरे बंगळुरूला आहे. अमेरिकेबाहेर भारतातच त्यांची सगळ्यात मोठी टेक टीम आहे. इथले लोक PayPal चं पेमेंट प्लॅटफॉर्म, क्लाऊड, मोबाईल अॅप, AI, डेटा सायन्स, ब्लॉकचेन अशा मोठमोठ्या गोष्टींवर काम करतात. भारत ही कंपनीसाठी खूप महत्त्वाची जागा आहे, तरीही इथेच नोकरकपात होत आहे.
PayPal गेल्या काही वर्षांपासून सतत खर्च कमी करण्यावर भर देत आहे.२०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने “2Q 2025 Plan” सुरू केला होता. यामध्ये त्यांची टेक्नॉलॉजी बदलणे, खर्च कमी करणे आणि मनुष्यबळ कमी करणे असा प्लॅन होता. हा प्लॅन १८ ते ४२ महिने चालणार आहे. यातलं मनुष्यबळ कमी करण्याचं काम २०२७ पर्यंत आणि टेक्नॉलॉजीचं काम २०२८ पर्यंत पूर्ण होईल असं कंपनीने सांगितलं होतं.
२०२५ च्या सुरुवातीला पण एका नवीन नियमामुळे कंपनीने लोकांना काढलं होतं. २०२४ आणि २०२३ मध्ये पण कंपनीने जागतिक पातळीवर नोकरकपात केली होती. तेव्हा कंपनीने सांगितलं होतं की आम्हाला आमचं काम सोपं करायचं आहे आणि खर्च कमी करायचा आहे.
या आठवड्यातच PayPal ने आयर्लंडमधील १६० कर्मचाऱ्यांना पण काढलं आहे, जे तिथल्या एकूण कर्मचाऱ्यांच्या १२% आहेत.एकंदरीत काय तर AI च्या नावाखाली मोठमोठ्या कंपन्या आता माणसांना कमी करत आहेत आणि भारतातल्या IT कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा इशारा आहे.