
Climate Change वर भारताचा Green प्लॅन! ( सौजन्य - सोशल मीडिया )
पंतप्रधान मोदी म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन धावली असून, ती जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन आहे. ही स्वच्छ वाहतुकीच्या एका नव्या युगाची सुरुवात आहे.”
पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या १२ वर्षांत भारताची पवन ऊर्जा क्षमता तिप्पट झाली आहे. जलविद्युत क्षमतेतही मोठी वाढ झाली आहे. नवा भारत अणुऊर्जेवरही लक्ष केंद्रित करत आहे. त्यांनी स्पष्ट केलं कींसरकार या क्षेत्रांमध्ये खाजगी कंपन्यांसाठीही संधी उपलब्ध करून देत आहे. या प्रयत्नांमुळे भारताच्या गैर-जीवाश्म ऊर्जा क्षमतेत ४०० टक्के वाढ झाली आहे.
ई-मोबिलिटीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०१४ पूर्वी भारतात दरवर्षी केवळ ३,००० ई-वाहने विकली जात होती. गेल्या वर्षी जवळपास २५ लाख ईव्ही विकल्या गेल्या, ही एक अविश्वसनीय वाढ आहे.यामुळे पर्यावरणाच्या संगोपनासाठी मदत होत आहे. फास्टॅगमुळे टोल नाक्यांवरील वेटिंग पिरीयड आणि इंधनाची नासाडी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. पंतप्रधान मोदींनी निदर्शनास आणून दिले की, २०१४ पर्यंत देशात केवळ पाच शहरांमध्ये २५० किमी पेक्षा कमी लांबीचे मेट्रो नेटवर्क होते. पण आज, २० हून अधिक शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार झाला आहे आणि १,००० किमी पेक्षा जास्त लांबीच्या मेट्रो नेटवर्कसह भारताने जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, रेल्वेच्या १००% विद्युतीकरणामुळे लाखो लिटर डिझेलची बचत झाली आहे, ज्यामुळे पर्यावरणालाही फायदा झाला आहे. पंतप्रधान म्हणाले की, आपला विकास जलद आणि शाश्वत दोन्ही आहे. आज जलसंधारणाच्या क्षेत्रातही अभूतपूर्व काम केले जात आहे.
७०,००० हून अधिक अमृत सरोवरे बांधण्यात आली आहेत. ‘कॅच द रेन’ पावसाचे पाणी साठवा या उपक्रमांतर्गत देशभरात जवळपास १.५ कोटी जलसंधारण संरचना बांधण्यात आल्या आहेत. नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय अभियानाने मोठा बदल घडवून आणला आहे. १२.५ लाख हेक्टरवर नैसर्गिक शेतीचे समूह तयार करण्यात आले आहेत. हवामानास अनुकूल पिकांच्या जवळपास ३,००० जाती विकसित करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कृषी-वनीकरणाला प्रोत्साहन देऊन आपण आपला कार्बन फूटप्रिंट कमी करत आहोत.
गेल्या १२ वर्षांत आपल्या घनदाट जंगलक्षेत्रात २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्लास्टिक कचऱ्याच्या आव्हानावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, म्हणूनच भारताने एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. आम्ही ‘कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा’ या मंत्राने चक्रीय अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिले आहे. आज भारतात दररोज हजारो टन कचऱ्यावर पुनर्वापर केला जात आहे. गोवर्धन योजनेच्या माध्यमातून गावातील शेण आणि इतर सेंद्रिय कचऱ्याचेही उपयुक्त संसाधनांमध्ये रूपांतर केले जात आहे.