
फोटो सौजन्य - Social Media
यंदा रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात एकूण ३ लाख २९ हजार ८०३ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी आतापर्यंत २ लाख ७१ हजार ४२५ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जमिनीत पुरेशी ओलावा टिकून राहिल्याने रब्बी पिकांच्या पेरणीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत असून रब्बी पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढल्याचे चित्र आहे.
रब्बी हंगामातील पिकांमध्ये यंदा हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी ७९ हजार ८९२ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. त्याखालोखाल गहू आणि मका या पिकांचे क्षेत्र आहे. हरभरा हे तुलनेने कमी खर्चाचे आणि अधिक उत्पन्न देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांनी त्याला प्राधान्य दिले आहे. तसेच सध्या असलेली थंडी हरभरा पिकासाठी पोषक ठरत असल्याचे शेतकरी सांगतात. गव्हाच्या पेरणीचे उद्दिष्टही जवळपास पूर्णत्वाकडे गेले असून, गहू पेरणीचे उद्दिष्ट सुमारे ८८ टक्क्यांपर्यंत साध्य झाले आहे.
दरम्यान, मक्याच्या पेरणीनेही यंदा विक्रमी टप्पा गाठला आहे. मक्याची पेरणी उद्दिष्टाच्या १३८ टक्के क्षेत्रावर झाली असून सुमारे २४ हजार २२२ हेक्टर क्षेत्रावर मक्याचा पेरा झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. याशिवाय रब्बी ज्वारीची पेरणीही ७ हजार ९३८ हेक्टर क्षेत्रावर झाली असून या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव घेतल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी नवीन पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. प्रयोगशील शेतकरी हळद, अद्रक, चिया, राजमा यांसारख्या पिकांची लागवड करत असून, यातून शाश्वत उत्पादन आणि अधिक उत्पन्न मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, तेलवर्गीय पिकांचा पेरा मात्र यंदा कमी झाल्याचे चित्र आहे. शासनाकडून तेलवर्गीय पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान जाहीर करण्यात आले असले, तरी शेतकरी नगदी पिकांनाच अधिक पसंती देत आहेत. जिल्ह्यात करडईची पेरणी केवळ २२ हेक्टर, तीळ १७ हेक्टर आणि सूर्यफुलाची पेरणी फक्त २३ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. गळीतधान्यांचे सरासरी पेरणी क्षेत्र १ हजार ९८४ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ २०० हेक्टरवरच पेरणी झाली आहे. एकूणच रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि मक्याच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.