फोटो सौजन्य - Social Media
UPSC ही भारतातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. अनेक जण वर्षानुवर्षे तयारी करूनही या परीक्षेत यश मिळवू शकत नाहीत. मात्र काही जण पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नातच यशस्वी होतात. अशातच भारतात काही असेही कुटुंब आहेत, जिथे एक-दोन नव्हे तर संपूर्ण कुटुंब प्रशासनात कार्यरत आहे. असाच एक कुटुंब म्हणजे राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील मीणा कुटुंब, ज्याला अनेकजण ‘IAS ची फॅक्टरी’ म्हणूनही ओळखतात.
या कुटुंबातील अर्नब प्रताप सिंह मीणा यांनी 2022 मध्ये UPSC परीक्षा पास करत 430वी AIR (All India Rank) मिळवली. अर्नब हे बामनवास गावचे रहिवासी आहेत. त्यांनी आपले शिक्षण लखनऊच्या सिटी मॉन्टेसरी स्कूल आणि दिल्ली पब्लिक स्कूल (DPS) मधून पूर्ण केलं. यानंतर त्यांनी लखनऊच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधून MBBS केलं. मात्र वैद्यकीय शिक्षण पूर्ण करूनही, अर्नब यांनी कुटुंबातील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सिव्हिल सेवा क्षेत्रात प्रवेश केला.
अर्नब यांचे वडील बाबूलाल मीणा हे 1991 बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांच्या काकांना, डॉ. बत्तीलाल मीणा, यांना IAS सेवेतून निवृत्ती मिळालेली आहे. याशिवाय अर्नबचे दोन चुलत भाऊही 2016 UPSC बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे कुटुंबातील आणखी एक सदस्य वीणा मीणा या 1993 बॅचच्या निवृत्त IAS अधिकारी आहेत. या कुटुंबात एकूण 6 अधिकारी सिव्हिल सेवा क्षेत्रात आहेत. त्यामुळे हे कुटुंब युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
अशाचप्रकारे, 2015 UPSC टॉपर टीना डाबी हिचे कुटुंबही अधिकारी कुटुंब म्हणून प्रसिद्ध आहे. टीना डाबी स्वतः IAS आहे, तिचा पती प्रदीप गवांडे IAS अधिकारी आहे. तिची बहीण रिया डाबी सुद्धा IAS अधिकारी आहे, तर रियाचा पती मनीष कुमार हे IPS अधिकारी आहेत. अलीकडेच त्यांची डूंगरपूर जिल्ह्याच्या SP पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या वडिलांनी भारतीय अभियांत्रिकी सेवा (IES) मध्ये काम केलं असून, आई हिमाली कांबळे या देखील निवृत्त IES अधिकारी आहेत.
या उदाहरणांवरून हे स्पष्ट होतं की परिश्रम, दिशा आणि कौटुंबिक पाठबळ असलं की UPSC सारख्या कठीण परीक्षा देखील जिंकता येतात. हे अधिकारी कुटुंब इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी उदाहरण आहे.