
फोटो सौजन्य - Social Media
खामगाव येथील गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात महिला सक्षमीकरण आणि जनजागृतीच्या दृष्टीने ‘जागर स्त्री–पुरुष समानतेचा’ हा विशेष सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महिला सक्षमीकरण व महिला उद्योजकता विकास समितीच्या वतीने ३ जानेवारी ते सोमवार, १२ जानेवारी या कालावधीत हा सप्ताह आयोजित करण्यात आला असून, या उपक्रमांतर्गत विविध शैक्षणिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्त्री–पुरुष समानतेबाबत जागरूकता निर्माण करणे, महिलांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना सक्षम बनवणे हा आहे.
या सप्ताहांतर्गत महिला सक्षमीकरण व महिला उद्योजकता विकास समिती आणि इनर व्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आणि वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. व्ही. पडघन हे होते. उद्घाटक म्हणून अजिंक्य बोबडे यांची उपस्थिती लाभली. प्रमुख अतिथी म्हणून स्वाती अग्रवाल, तर प्रमुख उपस्थिती म्हणून साक्षी गोयंका या उपस्थित होत्या. याशिवाय स्व. शंकररावजी बोबडे ज्ञानमंदिर यांच्या मुख्याध्यापिका खांडे यांनीही व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण व महिला उद्योजकता विकास समितीच्या समन्वयक डॉ. मारवाडी, तसेच स्वसंरक्षण समितीच्या समन्वयक प्रा. पूनम तिवारी यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वसंरक्षण समितीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये प्रा. योगेश म्हैसागर, प्रा. राजकुमार फाटे, प्रा. वर्षा कोकाटे, प्रा. वृषाली घोराळे, प्रा. डॉ. दिपाली धरमकार, प्रा. प्रदीप बानाईत, प्रा. नैना मिश्रा, प्रा. खंडारे आदी प्राध्यापकांचा सक्रिय सहभाग होता.
उद्घाटनप्रसंगी बोलताना अजिंक्य बोबडे यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. स्वसंरक्षण म्हणजे केवळ शारीरिक ताकद नव्हे, तर आत्मविश्वास, सजगता आणि प्रसंगावधान यांचा योग्य समन्वय असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या काळात विद्यार्थिनींनी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. अशा प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मभान निर्माण होऊन त्या निर्भीडपणे स्वतःचे संरक्षण करू शकतील, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी सर्व विद्यार्थिनींना प्रशिक्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. ए. व्ही. पडघन यांनी महाविद्यालयाच्या वतीने अशा उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले. स्त्री–पुरुष समानतेची जाणीव समाजात रुजवण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि त्या सामाजिक आव्हानांना सक्षमपणे तोंड देऊ शकतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘जागर स्त्री–पुरुष समानतेचा’ सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना, महिलांच्या हक्कांविषयी जाणीव आणि सुरक्षिततेबाबत सजगता निर्माण होत असून, हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.