फोटो सौजन्य - Social Media
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने २०२५ साली ग्राहक सेवा सहाय्यक (Customer Service Associate – CSA) किंवा क्लर्क पदासाठी सामाईक भरती प्रक्रिया (CRP CSA XV) सुरू केली आहे. ही भरती २०२६-२७ या वर्षासाठी देशभरातील सहभागी बँकांमध्ये रिक्त पदांसाठी केली जात आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली असून ती २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणार आहे. उमेदवारांनी www.ibps.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करणे आवश्यक आहे.
IBPS क्लर्क भरतीसाठी उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल. अर्जासाठी पात्रतेच्या अटी पाहता, अर्जदार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. रिक्त पदांची अचूक संख्या नंतर जाहीर केली जाणार आहे.या भरती प्रक्रियेमध्ये दोन टप्पे असणार आहेत, प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मुख्य परीक्षा. हे दोन्ही टप्पे संगणकीय पद्धतीने घेतले जातील आणि त्यांची तारीख ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२५ मध्ये ठेवण्यात आली आहे. परीक्षेनंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम IBPS च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर “CRP Clerical” विभागात जाऊन “CRP CSA XV” निवडावे. वैध मोबाइल नंबर व ईमेल आयडी वापरून नोंदणी करावी. अर्जात सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. यानंतर शुल्क भरावे, सामान्य, ओबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ₹८५०, तर अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग व माजी सैनिकांसाठी ₹१७५. शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाईल.
IBPS क्लर्क भरती ही देशातील सर्वात मोठ्या बँकिंग नोकरभरतींपैकी एक मानली जाते. स्पर्धा मोठी असल्यामुळे तयारी व्यवस्थित करणे गरजेचे आहे. या भरतीमुळे लाखो उमेदवारांना सरकारी बँकेत स्थिर व सुरक्षित नोकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.