फोटो सौजन्य- सोशल मीडिया
B.Tech AI & Sanskrit: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) या युगात जवळपास प्रत्येक क्षेत्राला एक नवीन चेहरा मिळाला असून, एआयची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. यामुळेच विद्यार्थी आपल्या करिअरसाठी एआयचा मार्ग निवडत आहेत, तर शिक्षण व्यवस्थाही तंत्रज्ञानाच्या दिशेने पावले टाकत विद्यार्थ्यांसाठी नवनवीन कोर्सेस आणत आहे. या पार्श्वभूमीवर भारतात तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा एक अनोखा संगम पाहायला मिळत आहे. देशात पहिल्यांदाच थेट ‘संस्कृत आणि एआय’चे एकत्रिकरण करण्यात आले असून अभिनव इंजिनिअरिंग कोर्स सुरू करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना केवळ एआय, डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगच नाही, तर संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरेचाही अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.
केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये एक अनोखा ‘बीटेक इन एआय, डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग’ (B.Tech in AI, Data Science, and Machine Learning) कोर्स सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची सुरुवात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रोग्रामला ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनची (AICTE) मंजुरी मिळाली असून, असा मान्यता प्राप्त असलेला हा भारतातील पहिलाच एआय बीटेक कोर्स ठरला आहे.
हा ‘बीटेक इन एआय, डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग’ कोर्स ४ वर्षांच्या कालावधीचा असेल. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग, डेटा सायन्स आणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, संस्कृत भाषा आणि व्याकरण, भारतीय ज्ञान प्रणाली तसेच नैतिकता आणि मूल्य आधारित तंत्रज्ञान या विषयांचा समावेश असेल.
या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स म्हणजेच ‘PCM’ या विषयांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया आणि जागांच्या संख्येबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत अधिसूचनेनुसार उपलब्ध होईल.
एआय आणि डेटा सायन्स ही आजच्या काळातील सर्वात वेगाने वाढणारी करिअरची क्षेत्रे आहेत. दुसरीकडे, संस्कृत ही जगातील सर्वात पद्धतशीर आणि वैज्ञानिक भाषा मानली जाते. तज्ज्ञांच्या मते, संस्कृतची व्याकरण रचना कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स (Computational Linguistics), नॅशनल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) आणि एआय रिसर्चमध्ये (AI Research) अत्यंत उपयुक्त ठरू शकते. याच दूरदृष्टीने हा आधुनिक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबतच भारतीय संस्कृतीची सखोल समज मिळेल, ज्यामुळे रिसर्च, एआय डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि शैक्षणिक क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.






