फोटो सौजन्य - Social Media
नुकतीच बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पुढे कोणता करिअर मार्ग निवडायचा? डॉक्टर, इंजिनिअर, वकील हे नेहमीचे पर्याय सर्वांनाच माहित असतात. मात्र, याशिवायही अनेक नवीन आणि पारंपरिक क्षेत्रं आजच्या युगात करिअरसाठी उत्तम संधी देतात. बारावीनंतर केवळ मार्कांच्या आधारावर नव्हे, तर आपल्या आवडी, कौशल्य आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन योग्य क्षेत्र निवडणं महत्त्वाचं ठरतं.
मुलांसाठी विज्ञान शाखेनंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर, आयटी अशा क्षेत्रांमध्ये संधी आहेत. याशिवाय नवनवीन कोर्सेससुद्धा उपलब्ध आहेत जसे की बायोटेक्नोलॉजी, नॅनोटेक्नोलॉजी, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि मशीन लर्निंग. हे क्षेत्र भविष्यातील उद्योगांचे आधारस्तंभ बनणार आहेत. कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी चार्टर्ड अकाउंटंट (CA), कंपनी सेक्रेटरी (CS), कॉस्ट अकाउंटंट, बँकिंग, फायनान्स, इन्व्हेस्टमेंट, शेअर मार्केट अॅनालिसिस, डिजिटल मार्केटिंग, आणि एमबीएसारखे अभ्यासक्रम करिअरसाठी फायदेशीर ठरू शकतात. डिजिटल युगामुळे या क्षेत्रात मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीज शाखेतले विद्यार्थी पत्रकारिता, मानसशास्त्र, समाजशास्त्र, लॉ, सिव्हिल सर्व्हिसेस, डिझायनिंग, अॅनिमेशन, मास कम्युनिकेशन, इव्हेंट मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेज यासारख्या क्षेत्रांत आपलं भविष्य उजळवू शकतात. हे सर्व क्षेत्र आता केवळ सर्जनशीलतेपुरते मर्यादित न राहता व्यावसायिक संधींनी भरलेले आहेत. तांत्रिक शिक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी पॉलिटेक्निक डिप्लोमा, ITI, स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसही उत्तम पर्याय आहेत. त्यामध्ये कमी वेळात कौशल्य प्राप्त करून नोकरी मिळवता येते. या कोर्सेसना सरकारी व खाजगी क्षेत्रात चांगली मागणी आहे.
याशिवाय फॅशन डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम, इंटिरिअर डिझायनिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेम डेव्हलपमेंट ही काही आधुनिक आणि आकर्षक करिअर क्षेत्रं आहेत, जी तरुणाईला भुरळ घालतात. म्हणूनच, बारावीनंतर करिअर निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते – मार्कांपेक्षा तुमचं ध्येय, आवड आणि त्यासाठीची तयारी महत्त्वाची असते. योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर कोणतंही क्षेत्र तुमचं भवितव्य उज्वल करू शकतं.