नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NCRTC) ने ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स (O&M) विभागातील विविध पदांसाठी थेट भरतीसंदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे. एनसीआरटीसी सध्या दिल्ली-मेरठ नमो भारत कॉरिडॉर प्रकल्पाची अंमलबजावणी करत असून, यासाठी अभियंता, तांत्रिक व प्रशासकीय अशा विविध प्रकारच्या पदांवर कुशल कर्मचाऱ्यांची गरज आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २४ मार्च २०२५ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ मे २०२५ आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये दोन टप्पे असणार आहेत. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) आणि वैद्यकीय तपासणी. CBT मध्ये एकूण १०० प्रश्न असतील, जे १०० गुणांचे असतील. परीक्षा ९० मिनिटांची असेल आणि त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. परीक्षा इंग्रजी व हिंदी या दोन भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. CBT उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी भारतीय रेल्वेच्या वैद्यकीय मानकांनुसार केली जाईल. मात्र, CBT उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवाराची अंतिम निवड निश्चित होणार नाही.
२४ मार्च २०२५ रोजी उमेदवाराचे वय कमाल २५ वर्षे असावे. वयाची सवलत अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) उमेदवारांना ५ वर्षे, इतर मागासवर्गीयांना (OBC-NCL) ३ वर्षे, तसेच दिव्यांग उमेदवारांना (PwBD) १० ते १५ वर्षे (श्रेणीनुसार) देण्यात येईल. माजी सैनिकांसाठी सैन्यसेवेच्या कालावधीनुसार + ३ वर्षे इतकी सवलत असून, कमाल वयोमर्यादा ५० वर्षे आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी NCRTC च्या ncrtc.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर “Career” विभागामध्ये जाऊन “O&M Vacancy Notice No. 13/2025” निवडावी. अर्जदारांनी प्रथम प्राथमिक माहिती भरून नोंदणी करावी आणि नंतर लॉगिन करून शैक्षणिक, वैयक्तिक व व्यावसायिक माहिती भरावी. यानंतर फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), तसेच दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) स्कॅन करून अपलोड करावे. त्यानंतर डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून शुल्क भरून अर्ज सादर करावा. अर्जाची प्रत प्रिंट करून भविष्यासाठी सुरक्षित ठेवावी. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाची नियमितपणे भेट घ्यावी.