फोटो सौजन्य - Social Media
2025 ही परीक्षा देशभरात आयोजित करण्यात येत आहे. यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी मुंबई आणि उपनगरांमध्ये विविध परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहणार आहेत. विशेषतः अनेक परीक्षार्थी मुंबईच्या बाहेरील भागातून परीक्षा केंद्रावर येणार असल्याने त्यांच्या वेळेत आणि विनाअडथळा पोहोचण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन, मुंबई शहर यांनी रेल्वे प्रशासनाला ४ मे रोजी कोणताही मेगा ब्लॉक ठेवू नये, अशी अधिकृत विनंती केली होती. दर रविवारी मुंबई उपनगरी रेल्वे सेवा विविध कारणांस्तव देखभाल व दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेत असते. मात्र, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी यावेळी हा निर्णय बदलण्यात आला आहे.
या विनंतीनुसार, रेल्वे प्रशासनाने ४ मे रोजी कोणताही मेगा ब्लॉक न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः सेंट्रल रेल्वे, हार्बर मार्ग आणि वेस्टर्न रेल्वे या तिन्ही मार्गांवर रेल्वे सेवा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहणार आहे. यामुळे NEET परीक्षार्थींना केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
याशिवाय, परीक्षेच्या दिवशी रेल्वे वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही याची खात्री करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून रेल्वेचे वेळापत्रक पाहावे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी दिली आहे.NEET (UG) 2025 परीक्षा ही देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची आणि स्पर्धात्मक परीक्षा आहे. लाखो विद्यार्थी आपल्या आयुष्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या परीक्षेला बसतात. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण, विलंब किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन आणि रेल्वे विभाग यांनी संयुक्तपणे विशेष तयारी केली आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचता यावे, यासाठी रेल्वेनेही आपली नियमित रविवारीची मेगा ब्लॉक सेवा रद्द केली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचे योग्य नियोजन करून, आवश्यक कागदपत्रे आणि ओळखपत्रे घेऊन परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेच्या अगोदर पोहोचावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. परीक्षेच्या यशस्वी पार पडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा सज्ज असून, पालक व विद्यार्थ्यांनी देखील सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.