
CBSE
CBSE Board Exam 2027 Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२७ च्या बोर्ड परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली असून देशभरातील आपल्या सर्व संलग्न शाळांना एक महत्त्वाचा इशारा आणि सूचना जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी निवडलेले विषय आणि त्यांची वैयक्तिक माहिती मंडळाकडे सादर करण्यापूर्वी शाळांनी तिची सखोल आणि अचूक तपासणी करावी, असे निर्देश सीबीएसईने दिले आहेत.
विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, पालकांचे नाव, विषयाचे नाव किंवा सब्जेक्ट कोड यामध्ये होणारी एक छोटीशी चूकसुद्धा पुढे जाऊन परीक्षेच्या प्रक्रियेत आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी अडचण ठरू शकते, त्यांचा प्रवेश रोखला जाऊ शकतो, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.
सीबीएसईने शाळांच्या प्राचार्यांना आणि प्रमुखांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, वारंवार सूचना देऊनही विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये चुका आढळत आहेत. काही शाळा वेळेत डेटा सादर करत नाहीत, तर काही शाळा चुकीची माहिती भरतात.
प्रक्रियेवर परिणाम: चुकीचा डेटा भरल्यानंतर शाळा सुधारणा करण्यासाठी अर्ज करतात, ज्यामुळे बोर्डाचा अतिरिक्त वेळ जातो आणि परीक्षेच्या नियोजनात अनावश्यक विलंब होतो.
LOC जमा करण्याचे आदेश: सीबीएसईने सर्व शाळांना ‘List of Candidates’ (LOC) आणि आवश्यक तपशील निश्चित केलेल्या मुदतीतच जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
सीबीएसई अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२७ च्या परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या प्रक्रिया लवकरच सुरू होत आहेत:
इयत्ता ९ वी आणि ११ वी: विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी (Registration).
इयत्ता १० वी आणि १२ वी: परीक्षार्थींची अंतिम यादी (LOC – List of Candidates) सादर करणे.
या पार्श्वभूमीवर शाळांनी आधीपासूनच प्रत्येक विद्यार्थ्याचा अचूक डेटा तयार ठेवावा, असे आवाहन बोर्डाने केले आहे.
२०२७ ची बोर्ड परीक्षा अत्यंत सुरळीत पार पाडणे आणि निकाल वेळेत जाहीर करणे हे सीबीएसईचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी शाळा आणि बोर्ड यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. डेटा भरताना घाईघाईत चुका करण्यापेक्षा, प्रत्येक माहिती अत्यंत अचूकतेने आणि काळजीपूर्वक तपासूनच अपलोड करावी, असा स्पष्ट संदेश सीबीएसईने दिला आहे.