
Image
CBSE Exam 2027: केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (CBSE) वर्ष २०२७ च्या १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. बोर्डाने आपल्या सर्व संलग्न शाळांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, त्यांनी इयत्ता ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशन डिटेल्स कोणतीही चूक न करता २१ ऑक्टोबरपर्यंत अनिवार्यपणे जमा करावीत. रजिस्ट्रेशनच्या वेळी डेटातील लहानशी चूकसुद्धा पुढे जाऊन विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र, मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेटमध्ये मोठ्या गडबडीचे कारण ठरते. हाच त्रास टाळण्यासाठी बोर्डाने या वेळी कठोर पावले उचलली आहेत.
अनेकदा फॉर्म भरताना विद्यार्थी किंवा पालकांच्या नावाचे स्पेलिंग, जन्म तारीख किंवा विषय कोड यामध्ये चुका होतात. परीक्षेच्या वेळी किंवा निकाल आल्यानंतर या चुका सुधारण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. सीबीएसईने स्पष्ट केले आहे की, एकदा ‘लिस्ट ऑफ कॅँडीडेट्स’ (LOC) आणि रजिस्ट्रेशन डेटा सबमिट झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या बदलास सहजासहजी परवानगी दिली जाणार नाही.
सीबीएसईने सर्व शाळांचे प्रिन्सिपल्स आणि परीक्षा प्रमुखांना खालील मुद्द्यांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.
व्हेरिफिकेशनची जबाबदारी: शाळा प्रशासनाने विद्यार्थ्याचे नाव, आई-वडिलांचे नाव आणि जन्म तारीख यांची पडताळणी शाळेच्या अधिकृत ॲडमिशन रजिस्टर आणि आधार कागदपत्रांशी करावी.
विषय कोडची तपासणी: विद्यार्थ्यांनी निवडलेले विषय आणि त्यांचे संबंधित विषय कोड सबमिट करण्यापूर्वी पुन्हा एकदा तपासावेत.
अंतिम मुदतीचे पालन: २१ ऑक्टोबरच्या डेडलाइननंतर सीबीएसई पोर्टलवर नवीन डेटा स्वीकारला जाणार नाही किंवा त्यासाठी मोठा विलंब शुल्क आकारला जाऊ शकतो.
सीबीएसईने पालक आणि विद्यार्थ्यांना देखील आवाहन केले आहे की, जेव्हा शाळा प्रशासन त्यांना डिटेल्स तपासण्यासाठी बोलावेल, तेव्हा त्यांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचूनच आपल्या स्वाक्षऱ्या कराव्यात. स्पेलिंगमध्ये कोणतीही चूक किंवा जन्म तारखेमध्ये तफावत आढळल्यास त्वरित शाळा प्रशासनाला कळवावे, जेणेकरून २१ ऑक्टोबरपूर्वी रेकॉर्डमध्ये सुधारणा करता येईल. पालकांच्या स्वाक्षऱ्या आणि पडताळणीनंतरच फायनल डेटा सीबीएसई पोर्टलवर लॉक केला जाईल.