फोटो सौजन्य - Social Media
कोणत्याही यशामागे सातत्यपूर्ण मेहनत आणि फोकस आवश्यक असतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे चंदीगडचा चैतन्य अग्रवाल. त्यांनी 2021 मध्ये घेतलेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेत अखिल भारतीय 8वी रँक मिळवली होती. त्यांनी 360 पैकी तब्बल 324 गुण मिळवले आणि ट्राइसिटी टॉपरचा किताब देखील पटकावला. ही यशोगाथा फक्त गुणांची नाही, तर त्यांच्या कठोर परिश्रमांची आणि समर्पणाची आहे.
चैतन्य यांचा जन्म आणि शिक्षण चंदीगडमध्ये झाले. 10वीपर्यंतचे शिक्षण त्यांनी सेंट अॅनी स्कूलमधून पूर्ण केले आणि 11वी-12वी श्री गुरु हरकिशन स्कूल, सेक्टर 40, चंदीगडमध्ये केले. जेईईसारख्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेची तयारी करताना चैतन्य दररोज 10-12 तास अभ्यास करत होते. लॉकडाउनच्या काळात शाळा बंद असल्याने त्यांना सेल्फ स्टडीसाठी भरपूर वेळ मिळाला. त्यांनी सोशल मीडियावरून पूर्ण ब्रेक घेतला होता, जेणेकरून अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करता येईल.
ते म्हणतात, “नियमितता आणि फोकस हीच यशाची खरी किल्ली आहे.” यापूर्वी त्यांनी जेईई मेन्स परीक्षेतही 62वी रँक मिळवली होती. अभ्यास करताना फक्त वेळ घालवण्याऐवजी त्यांनी संकल्पनात्मक समज वाढवण्यावर भर दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, जेवढं अधिक वेळ आपण गुणवत्तेच्या अभ्यासासाठी देतो, तेवढा यशाचा मार्ग सुकर होतो.
चैतन्य यांचे वडील संजीव कुमार हे रिअल इस्टेट एजंट आहेत आणि आई निशा सिंगला या नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. दोघांनीही आपल्या मुलाला शैक्षणिक वाटचालीसाठी सतत प्रोत्साहन दिलं आणि अभ्यासासाठी घरात शांत व प्रेरणादायी वातावरण तयार केलं. चैतन्य यांच्या यशामागे केवळ त्यांची मेहनतच नव्हे, तर त्यांच्या पालकांनी दिलेलं पाठबळही मोठं कारण आहे. त्यांनी मुलाच्या अभ्यासात कधीही अडथळा आणला नाही, उलट त्याचं मनोबल वाढवण्यासाठी नेहमी साथ दिली.
चैतन्य सध्या आयआयटी बॉम्बे येथून कंप्युटर सायन्स शाखेत बीटेक पूर्ण करून आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रात अनुभव मिळवण्यासाठी आघाडीच्या फ्रँकलिन टेम्पलटन या कंपनीत इंटर्नशिप पूर्ण केली आहे. त्यानंतर त्यांची निवड नेदरलँडमधील अॅम्स्टर्डॅम-झुइड येथील जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या Optiver कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी झाली आहे, जे कोणत्याही भारतीय विद्यार्थ्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. चैतन्य अग्रवाल यांचा प्रवास केवळ गुणांच्या आकड्यांपुरता मर्यादित नाही, तर तो एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्याने मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची प्रेरणादायक कहाणी आहे. मेहनत, समर्पण आणि योग्य दिशेने केलेले प्रयत्न कोणतीही उंची गाठू शकतात, हे त्यांच्या यशातून शिकता येतं. त्यांच्या प्रवासाने देशभरातील अनेक विद्यार्थ्यांना नवी उमेद दिली आहे.