फोटो सौजन्य - Social Media
उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण परिषद (UPMSP) लवकरच 10वी आणि 12वीच्या परीक्षा निकालांची घोषणा करणार आहे. हा निकाल परिषदच्या अधिकृत वेबसाइट्स upmsp.edu.in आणि upmspresults.nic.in वर जाहीर केला जाईल. विद्यार्थी आपला रोल नंबर टाकून निकाल पाहू शकतील. 15 एप्रिलला दुपारी 2 वाजता निकाल जाहीर होणार असल्याच्या बातम्या बनावट आहेत आणि राज्यात वारीच्या वेगाने प्रसिद्ध होत होते. मुळात, ही बातमी निव्वळ अफवा होती कारण निकालाची अधिकृत माहिती फक्त परिषदच्या अधिकृत संकेतस्थळावरच दिली जाईल. जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, निकाल 20 एप्रिलनंतर कधीही जाहीर केला जाऊ शकतो आणि एप्रिल अखेरीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन पूर्ण झाले असून, निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
गेल्या वर्षी, 20 एप्रिल 2024 रोजी 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झाले होते. तेव्हा 10वीची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 89.55% होती, तर 12वीची टक्केवारी 82.60% होती. नेहमीप्रमाणे, या वर्षीही यूपी बोर्ड 10वी आणि 12वीचे निकाल पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करणार आहे. दोन्ही वर्गांचे निकाल एकत्र जाहीर केले जातात.
उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाची (UP Board) 2025 ची बोर्ड परीक्षा 24 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 12 मार्च 2025 दरम्यान संपूर्ण राज्यात पार पडली होती. या परीक्षांसाठी राज्यभरात एकूण 8,140 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. येथे लाखो विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा दिली. परीक्षेनंतर लगेचच उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनही सुरू करण्यात आले. 17 मार्चपासून मूल्यांकन प्रक्रियेला सुरुवात झाली आणि राज्यभरातील 261 मूल्यांकन केंद्रांवर उत्तरपत्रिकांचे बारकाईने परीक्षण करण्यात आले.
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास तीन कोटी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन 19 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. ही प्रक्रिया अत्यंत नियोजित आणि वेळेत पूर्ण करण्यात आल्यामुळे निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी बोर्डाने आधीच शासनाकडे निकाल घोषित करण्यासाठी अधिकृत प्रस्ताव पाठवला असून, सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली जाईल.