फोटो सौजन्य - Social Media
विज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र क्षेत्रात संशोधनाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि प्रतिष्ठित संधी उपलब्ध झाली आहे. सायन्स अकादमीज समर रिसर्च फेलोशिप प्रोग्राम (SRFP) २०२६ अंतर्गत उन्हाळी संशोधन फेलोशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. हा कार्यक्रम इंडियन अकादमी ऑफ सायन्सेस (IAS), बेंगळुरू, इंडियन नॅशनल सायन्स अकादमी (INSA), नवी दिल्ली आणि नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस (NASI), प्रयागराज या देशातील नामांकित वैज्ञानिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येतो.
हा फेलोशिप कार्यक्रम विशेषतः विज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी तसेच तरुण प्राध्यापकांसाठी आहे. संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना या कार्यक्रमातून थेट अनुभवी, तज्ज्ञ आणि समर्पित मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे संशोधनाची योग्य दिशा, पद्धत आणि शिस्त शिकण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त मानला जातो.
सायन्स अकादमीज समर रिसर्च फेलोशिप प्रोग्राम हा केवळ सैद्धांतिक अभ्यासापुरता मर्यादित नसून पूर्णतः संशोधन-केंद्रित आहे. निवड झालेल्या उमेदवारांना उन्हाळी कालावधीत (समर ब्रेकमध्ये) देशातील विविध संशोधन संस्था, विद्यापीठे आणि प्रयोगशाळांमध्ये प्रत्यक्ष संशोधन करण्याची संधी दिली जाते. या काळात उमेदवार प्रत्यक्ष प्रयोग, प्रकल्प, डेटा विश्लेषण आणि संशोधन लेखन यांचा अनुभव घेतात.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करतो, तसेच भविष्यातील पीएचडी किंवा उच्चस्तरीय संशोधनासाठी मजबूत पाया घालतो. अनेक विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम संशोधन क्षेत्रात करिअर करण्याचा टर्निंग पॉइंट ठरलेला आहे.
उमेदवारांची निवड संबंधित अकादमींच्या विवेकबुद्धीनुसार केली जाईल. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनाची आवड, पूर्वानुभव आणि अर्जामध्ये दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांची छाननी केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना मार्गदर्शक (मेंटॉर) नियुक्त केले जातील, ज्यांच्या देखरेखीखाली ते संशोधन पूर्ण करतील.
अर्ज कसा करावा?
या फेलोशिपसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ आहे. वेळेआधी अर्ज करणे फायदेशीर ठरेल, असा सल्ला देण्यात येत आहे.
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ :
👉 https://webjapps.ias.ac.in/fellowship2026/index.html
कोणासाठी उपयुक्त?
संशोधनाची आवड असलेले पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी, तसेच तरुण प्राध्यापकांसाठी ही फेलोशिप अत्यंत उपयुक्त आहे. देशातील सर्वोच्च वैज्ञानिक संस्थांशी थेट संपर्क, मार्गदर्शन आणि संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी ही एक अनोखी संधी मानली जाते.
संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी ही संधी नक्कीच साधावी, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.






