
ceop
सोनाजी गाढवे, नवराष्ट्र पुणे
COEP Tech & ARAI Partnership: सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) तर्फे सीओईपीच्या चिखली येथील रिसर्च अँड इनोव्हेशन पार्कमध्ये एडव्हान्स्ड एरगोनॉमिक्स अँड ह्युमन फॅक्टर्स रिसर्च सेंटर (एईएचएफआरसी) अर्थात ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र आणि मानवी घटक संशोधन केंद्र’ स्थापन करण्यासंदर्भात एकत्रितपणे पुढाकार घेण्यात आला आहे. भारतीयांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांच्या आधारे अभियांत्रिकी तंत्रज्ञान विकसित करणारे हे देशातील पहिलेच संशोधन केंद्र असून यामध्ये १०५ कोटी रूपयांची एकत्रित गुंतवणूक करण्यात येणार आहे.
या संदर्भातील संमती पत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून यावेळी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनिल भिरुड, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे, विशेष कर्तव्य अधिकारी डॉ. अविनाश जोशी, आरआयआयएल (रील)चे संचालक डॉ. एस. पी. महाजन, एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, वरिष्ठ उपसंचालक आणि एफएमसीईच्या विभाग प्रमुख मेधा जांभळे, वरिष्ठ उप संचालक आणि कॉर्पोरेट प्लानिंग आणि बिजनेस प्रमुख विजय पंखावाला, वरिष्ठ उपसंचालक आणि इंजिनिअरींग डिझाइन अँड सिम्युलेशन सेंटरचे विभाग प्रमुख राहुल महाजन आणि उपसंचालक महेश पटवर्धन उपस्थित होते.
सुमारे ३८ हजार चौरस फुटांवर उभारण्यात येणाऱ्या या केंद्रामुळे या क्षेत्रातील युरोपीयन तंत्रज्ञानाचा दबदबा कमी होणार असून स्वदेशी संशोधन व विकास क्षमता बळकट करणे आणि ‘आत्मनिर्भर भारता’च्या संकल्पनेशी सुसंगत नवोन्मेषाला चालना देणे, हा या संशोधन केंद्राचा मुख्य उद्देश आहे.
राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र म्हणून विकसित होणारे हे संशोधन केंद्र एर्गोनॉमिक्स आणि ह्युमन फॅक्टर्स क्षेत्रातील संशोधन, चाचणी, प्रमाणीकरण, प्रशिक्षण, नवोन्मेष आणि उद्योग सहभागावर भर देणार आहे.
या सुविधेचा लाभ ऑटोमोटिव्ह, संरक्षण, अवकाश संशोधन, रेल्वे, कृषी, औद्योगिक उपकरणे, ग्राहक उत्पादने, फर्निचर, बांधकाम व वास्तुशास्त्रीय वातावरण आणि वस्त्रनिर्मिती अशा विविध क्षेत्रांना होणार आहे. या संशोधन केंद्राच्या माध्यमातून अभियांत्रिकी क्षेत्रातील विशेष प्रशिक्षण, प्रमाणन आणि कौशल्यविकास कार्यक्रम राबवून कुशल मनुष्यबळ निर्मितीलाही चालना दिली जाणार आहे.
एआरएआयचे संशोधन, चाचणी, प्रमाणन, अभियांत्रिकी आणि मानके विकसित करण्याचे कौशल्य आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाची शैक्षणिक व संशोधन क्षमता यांची सांगड घालून भारतातील प्रगत एर्गोनॉमिक्स आणि ह्युमन फॅक्टर्स क्षमतांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी ही भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
भारतीय वापरकर्ते आणि देशातील विविध कार्यपरिस्थिती लक्षात घेऊन अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि वापरकर्ताकेंद्रित उत्पादने आणि प्रणाली विकसित करण्यासाठी हे संशोधन केंद्र सहाय्यभूत ठरणार आहे. हे संशोधन केंद्र संयुक्तपणे विकसित करण्यात येणार असून उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारे वैज्ञानिक संशोधनातील प्रगतीशील उपाय आणि व्यावसायिक अनुप्रयोगांमध्ये रूपांतर करण्यासाठी ट्रान्सलेशनल रिसर्चला चालना देण्यात येणार आहे.
दोन्ही संस्थांमधील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या संयुक्त कौशल्याचा या संशोधन केंद्रात उपयोग केला जाणार आहे. त्याचबरोबर उद्योग, शिक्षण संस्था, सरकार यांच्यातील सहकार्याला बळ देणारी सक्षम चौकट विकसित केली जाणार आहे.
भारतीय एर्गोनॉमिक्स मानके, मानवमितीय (Anthropometric) डेटाबेस, नाविन्यपूर्ण चाचणी पद्धती, वापरयोग्यता अभियांत्रिकी (Usability Engineering) चौकट आणि भारतीय वापराच्या परिस्थितींवर आधारित प्रगत ह्युमन फॅक्टर्स संशोधन क्षमता विकसित करणे हे एआरएआयचे वैशिष्ट्य असून या माध्यमातून उत्पादनांची वापरयोग्यता, सुरक्षितता, आरामदायीपणा आणि उत्पादकता वाढविण्यासोबतच जागतिक स्पर्धेतील भारतीय तंत्रज्ञानाची क्षमता बळकट होण्यास मदत होईल.
या भागीदारीअंतर्गत एआरएआय आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ संयुक्तपणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प, सल्लागार सेवा, प्रायोजित संशोधन कार्यक्रम तसेच सरकारी संस्था, उद्योग भागीदार, सीएसआर उपक्रम आणि इतर संस्थांकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा पाठपुरावा करणार आहेत.
या सहकार्याबाबत बोलताना एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई म्हणाले की, “तंत्रज्ञान अधिकाधिक मानवी-केंद्रित होत असताना सुरक्षितता, वापरयोग्यता आणि वापरकर्त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासंदर्भात एर्गोनॉमिक्स आणि ह्युमन फॅक्टर्स तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाबरोबर होत असलेल्या या भागीदारीच्या माध्यमातून संशोधनाला चालना देणारी, स्वदेशी क्षमता विकसित करणारी आणि भारतीय वापरकर्ते व परिस्थितींना अधिक अनुरूप उत्पादने व प्रणाली विकसित करण्यासाठी उद्योगांना सहाय्य करणारी राष्ट्रीय परिसंस्था निर्माण करण्याचा एआरएआयचा प्रयत्न आहे. मानवी-केंद्रित डिझाइन आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारताची क्षमता बळकट करण्यासाठी एईएचएफआरसी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
यावेळी बोलताना सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनिल भिरूड म्हणाले की, “संशोधनाचे सामाजिक परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ सातत्याने कार्यरत आहे. एआरएआयच्या सहकार्याने प्रस्तावित एईएचएफआरसी हे एर्गोनॉमिक्स आणि ह्युमन फॅक्टर्स क्षेत्रातील आंतरशाखीय संशोधन, नवोन्मेष आणि उद्योग सहभागासाठी एक अद्वितीय व्यासपीठ ठरणार आहे. भारतीय मानकांच्या विकासाला, स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीला आणि राष्ट्रीय व जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम अशा कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीला या उपक्रमातून महत्त्वपूर्ण योगदान मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.
विकसीत भारताचे ध्येय असलेला हा उपक्रम महाराष्ट्राला संशोधन, नवोन्मेष आणि प्रगत उत्पादन क्षेत्राचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून या माध्यमातून ऑटोमोटिव्ह संशोधन, उत्पादन आणि शैक्षणिक क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांचे केंद्र असलेल्या पुण्यात राष्ट्रीय स्तरावरील अत्याधुनिक सुविधा उभारली जाणार आहे. या संशोधन केंद्राच्या क्षमता विकसीत करण्यासाठी जगातील आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्यांच्या अंतर्गत प्रयोगशाळांसारख्या जागतिक मानांकांचा संदर्भ घेतला जाणार आहे. यामुळे एर्गोनॉमिक्सविषयक चाचण्या आणि सुविधांसाठी भारताचे युरोपीय देशांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
या सुविधेमुळे उद्योग क्षेत्र, संशोधक आणि जागतिक स्तरावरील सहकारी संस्थांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यास चालना मिळणे अपेक्षित असून जागतिक तंत्रज्ञानाच्या नकाशावरील महाराष्ट्राची ओळख अधिक बळकट होण्यास मदत होईल. भारतीय एर्गोनॉमिक्स मार्गदर्शक तत्त्वे व डिझाइन मानके, संशोधन प्रकाशने आणि पेटंट्स विकसित होण्याबरोबरच अभियंते, डिझायनर्स आणि संशोधकांचा कुशल मनुष्यबळाचा सक्षम समूह निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.