
फोटो सौजन्य - Social Media
शिक्षक, मुख्याध्यापक आणि तिथे उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “चांगले शिक्षक आणि चांगले शिक्षण नसेल तर आयुष्याचे वाटोळे होते. शिक्षक आमदार म्हणून आपण अभ्यंकरांना निवडून दिल्याचा मला अभिमान आहे. विधानपरिषदेत त्यांनी केलेले काम आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांची बांधिलकी उल्लेखनीय आहे.” त्यांनी डिजिटल शिक्षणाच्या वाढत्या गरजेवर भर देत सांगितले की, डिजिटल शिक्षण ही आजची नवी भाषा आहे. महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे दप्तर हलके करण्यापासून ते टॅब देण्यापर्यंत व व्हर्च्युअल क्लासरूम उभारण्यापर्यंतच्या उपक्रमामागे बाळासाहेब ठाकरे यांचीच दूरदृष्टी होती, असे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांना देशद्रोही ठरवण्याच्या प्रवृत्तीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “ही चिंताजनक प्रवृत्ती असून, समाजात भेदभावाची दृष्टी वाढत असल्याचे हे लक्षण आहे,” असे ठाकरे म्हणाले. त्यांच्या भाषणानंतर शाळांना डिजिटल बोर्डाचे प्रत्यक्ष वाटप सुरू झाले.
कार्यक्रमात शिक्षक सेना कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे, राज्य समन्वयक नितीन चौधरी, सरचिटणीस प्रकाश शेळके, ज्युनिअर कॉलेज अध्यक्ष आर. बी. पाटील, तसेच उपाध्यक्ष सलीम शेख, सहसचिव मारुती पडळकर, मुंबई विभागाध्यक्ष अजित चव्हाण आणि मुंबई महिला अध्यक्षा मानसी चाळके यांची उपस्थिती लक्षणीय होती. या प्रसंगी आपल्या प्रास्ताविकात आमदार ज. मो. अभ्यंकर म्हणाले की, अनुदानित शाळांची परिस्थिती अत्यंत बिकट असून, तुटपुंज्या वेतनेतर अनुदानामुळे संस्थांना शाळा चालवणे कठीण झाले आहे. “अनुदानित शाळांतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझा संपूर्ण विकास निधी वापरणार आहे. शैक्षणिक साधनांची कमतरता भासू देणार नाही,” असे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी शासनाने या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणीही केली.
या कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटक्या शब्दांत सूत्रसंचालन कमलाकर मोरे यांनी केले. डिजिटल बोर्डामुळे मुंबईतील विद्यार्थ्यांना आधुनिक साधनांचा लाभ मिळून शिक्षण अधिक समजण्यासारखे, रोचक आणि परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.