
फोटो सौजन्य - Social Media
या वर्षीच्या विज्ञान प्रदर्शनाची संकल्पना ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम’ अशी होती. या प्रमुख संकल्पनेशी सुसंगत राहील अशा पद्धतीने सामाजिक, पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाधारित सात उपविषयांची निवड करण्यात आली होती. या उपविषयांवर आधारित इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ५० नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांचे निरीक्षण कौशल्य, तर्कशक्ती, नवनिर्मितीची वृत्ती आणि संशोधनाची आवड यांचा उत्कृष्ट संगम या प्रकल्पांत दिसून येत होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन राजीव गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी संदेश विद्यालयाच्या प्राचार्या मेघा म्हात्रे, शिक्षकवर्ग, विविध शाखांचे समन्वयक तसेच संकुलातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक मनोहर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘स्वागत गीत’ आणि ‘विज्ञान युगाचे स्वागत’ या आकर्षक विज्ञान-गीतांनी झाली.
विज्ञान प्रदर्शनाचे सूत्रसंचालन शिवाजी बोरसे यांनी प्रभावीपणे केले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सनराईज इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका फातिमा टोले, संदेश विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रवीण झोपे, तसेच सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. प्रत्येक प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनी प्रयोगांची रचना, मॉडेल्सची मांडणी, पर्यावरणपूरक साधनांचा वापर आणि समस्यांवरील वैज्ञानिक उपाय याबाबत विशेष भर दिला.
प्रदर्शनाला २१५० विद्यार्थी आणि ५८५ पालकांनी भेट दिली. संपूर्ण दिवसभर विद्यार्थी-पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. प्रत्येक प्रकल्पासमोर विद्यार्थ्यांनी दिलेली स्पष्टीकरणे, त्यांच्या कल्पकतेचे प्रात्यक्षिक आणि आजच्या काळातील प्रश्नांना दिलेली तंत्रज्ञानाधारित उत्तरांची मांडणी पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास संदेश विद्यालय प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पांडुरंग पुरी, संदेश विद्यालय-टॅगोर नगरच्या उपमुख्याध्यापिका श्वेता मोहिते, सुनीता मोरे यांसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमुळे संपूर्ण सभागृहात विज्ञानमय वातावरण निर्माण झाले होते. प्रयोगशाळा, मॉडेल्स, तांत्रिक उपकरणे आणि विविध थीमॅटिक प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ‘विज्ञान म्हणजे केवळ विषय नसून दैनंदिन जीवनाचा पाया’ हे प्रत्यक्ष अनुभवातून दाखवून दिले.
या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक वृत्तीला चालना मिळून त्यांच्यात संशोधनमूलक विचारसरणी अधिक बळकट झाली. भविष्यातही अशा उपक्रमांमुळे अनेक विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे शोध, नवे प्रयोग आणि नवी वाटचाल करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.