
fifa
FIFA World Cup 2026 Sports Commentary Career Options: फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक म्हणजेच ‘फिफा वर्ल्ड कप २०२६’ (FIFA World Cup 2026) चा थरार सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. ११ जून २०२६ पासून सुरू झालेली ही स्पर्धा १९ जुलै २०२६ पर्यंत चालणार आहे. जेव्हा फिफा वर्ल्ड कपसारखी मोठी स्पर्धा टीव्हीवर सुरू असते, तेव्हा स्टेडियममधील प्रत्येक हालचाल शब्दांत मांडणारा स्पोर्ट्स कमेंटेटरचा आवाज सामना पाहण्याचा आनंद दुप्पट करतो. यामुळेच अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की, समालोचन (कमेंट्री) करण्याची ही नोकरी कशी मिळते आणि त्यासाठी कोणते शिक्षण आवश्यक असते? चला तर मग जाणून घेऊया
कमेंटेटर किंवा स्पोर्ट्स होस्ट बनण्यासाठी कोणताही स्वतंत्र किंवा विशिष्ट कोर्स उपलब्ध नाही, परंतु यासाठी तुम्ही मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. मास कम्युनिकेशन अंतर्गत न्यूज मीडिया आणि जर्नलिझम यांसारखे अनेक अभ्यासक्रम असतात. यामध्ये ‘स्पोर्ट्स जर्नलिझम’ (क्रीडा पत्रकारिता) नावाचा एक विशेष कोर्स असतो, जो या क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवाराने १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, केवळ स्पोर्ट्स जर्नलिझमची पदवी घेणे पुरेसे नसते. जर तुम्हाला एक उत्तम कमेंटेटर बनायचे असेल, तर शिक्षणासोबतच तुमची हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर चांगली पकड असणे आवश्यक आहे. तुम्हाला ज्या खेळाची कमेंट्री करायची आहे, त्या खेळाचे नियम आणि कायदे यांची परिपूर्ण माहिती असली पाहिजे.
सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या प्रेक्षकांना खेळाडूंची माहिती देण्यासाठी त्यांच्या भूतकाळातील कामगिरीची आणि पार्श्वभूमीची माहिती कमेंटेटरला असावी लागती. बऱ्याचदा माहिती पूर्ण असते, परंतु बोलण्यात तो प्रभावीपणा नसला तर ही नोकरी मिळणे कठीण होते. म्हणूनच, माहितीसोबतच तुमच्या बोलण्याच्या शैलीवर लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खरी आव्हाने सुरू होतात, जेव्हा तुम्हाला कामाची संधी शोधावी लागते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, कोणालाही सुरुवातीला थेट फिफा वर्ल्ड कप किंवा मोठ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कमेंट्री करण्याची संधी मिळत नाही. त्यासाठी आधी स्थानिक किंवा छोट्या पातळीवर काम करावे लागते. हळूहळू जसा अनुभव वाढतो, तसे विविध स्पोर्ट्स चॅनेल्स आणि मीडिया कंपन्या मोठ्या स्पर्धांसाठी समालोचन करण्याची संधी देऊ लागतात.