
फोटो सौजन्य - Social Media
राजस्थानमधील वंदना मीना हिने मिळवले यश आदर्श घेण्यासारखे आहे. वंदना मीना या राजस्थानमधील टोकसी गावच्या रहिवासी आहेत. हे गाव राजस्थानमध्ये स्थित आहे. या गावात अगदी आधीपासूनच मूलभूत सोयीसुविधांची कमतरता होती. त्या सर्व गोष्टींशी लढा देऊन त्यांना मात करत वंदनाने आज तिचे नाव देशभरात गौरवले आहे. वंदनाचे वडील दिल्ली पोलिसांत कार्यरत होते तर तिची आई गृहिणी होती. वंदनाला अगदी लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. अभ्यासात बरीच हुशार असणाऱ्या वंदनाचे ख्वाबही तसे बरेच होते.
पुढे तिने चांगल्या शिक्षणासाठी कुटुंबासोबत दिल्लीला स्थलांतर केले. तिने दिल्लीतील सेंट कोलंबा शाळेतून शालेय शिक्षण घेतले. शालेय जीवनापासूनच ती फार हुशार होती. तिने दिल्ली विद्यापीठातून गणित (Maths) विषयात ऑनर्स पदवी मिळवली होती. शाळा असो वा कॉलेज, अगदी सगळीकडे तिने चांगलेच गुण मिळवले होते. तिला देशासाठी काही तरी करण्याची जिद्द होती. हीच जिद्द तिला पुढे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेकडे घेऊन गेली. देशाच्या प्रशासकीय सेवेत काम करून समाजासाठी योगदान द्यायचे, हे ध्येय तिने निश्चित केले. या परीक्षेची तयारी करताना वंदनाने कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. तिने स्वयंअध्ययनावर पूर्ण विश्वास ठेवत अभ्यासाची ठोस आणि शिस्तबद्ध दिनचर्या तयार केली. दररोज १५ ते १६ तास अभ्यास करून तिने प्रत्येक विषय सखोलपणे समजून घेण्यावर भर दिला. पाठांतरापेक्षा संकल्पना स्पष्ट असणे अधिक महत्त्वाचे आहे, असे तिचे ठाम मत होते.
वंदनाने अभ्यासासाठी प्रमाणित पुस्तके, वर्तमानपत्रे आणि विश्वासार्ह ऑनलाइन स्रोतांचा वापर केला. पर्यायी विषयांसोबतच निबंध आणि नीतिशास्त्र या पेपरांकडे तिने विशेष लक्ष दिले, कारण या विषयांमधून अधिक गुण मिळवता येतात, असा तिचा अनुभव होता. तयारीदरम्यान अनेक अडचणी आल्या, कधी थकवा जाणवला, तर कधी आत्मविश्वास डगमगला; मात्र तिने कधीही हार मानली नाही. मेहनत आणि संयम यांवर विश्वास ठेवत तिने सातत्य कायम ठेवले. अखेर तिच्या अथक परिश्रमांना यश आले. २०२१ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत वंदना मीना हिने ऑल इंडिया रँक ३३१ मिळवत आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. तिच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण गावाचा मान अभिमानाने उंचावला. कमी सुविधा, मर्यादित साधने आणि कोणतेही कोचिंग नसतानाही मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते.
वंदना मीना आपल्या यशाचे श्रेय केवळ कठोर परिश्रम, शिस्त आणि समर्पणाला देते. यशासाठी शॉर्टकट नसतो, मेहनत आणि आत्मविश्वास हाच खरा मार्ग आहे, हा संदेश तिच्या यशकथेतून स्पष्टपणे मिळतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तिची ही वाटचाल आदर्श ठरते आणि “स्वप्न पाहा, त्यासाठी झटत राहा, यश नक्की मिळते” हा विश्वास अधिक बळकट करते.