
inspirational stories
Inspiring Story: जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांची तयारी असेल, तर माणूस कोणत्याही संकटावर मात करून यशाचे शिखर गाठू शकतो, हे आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील गणीशेट्टीपालेम या छोट्याशा गावातील जामी सिम्हाचलम नायडू यांनी सिद्ध करून दाखवले आहे. दोन्ही हात आणि एका पायात गंभीर दिव्यांगत्व घेऊन जन्मलेल्या जामी यांनी आपल्या शारीरिक कमतरतेला कधीही अडथळा बनू दिले नाही.
ज्या मुलाला पाहून लोक विचार करायचे की ‘हा मुलगा भविष्यात काय करणार?’, त्याच जामी यांनी असा पराक्रम करून दाखवला, जो एका सामान्य माणसालाही अचंबित करेल.
Delhi University निवडणूक! कोण बनू शकतं उमेदवार? हायकोर्टाचा निर्णय अन् खर्चाची मर्यादा एकदा वाचाच
जामी सिम्हाचलम नायडू यांचे दोन्ही हात जन्मापासूनच काम करत नव्हते. जामी जेव्हा अवघ्या साडेतीन वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या काकांनी (जामी नरसिम्हा राव) एका मासिकात पायाने लिहिणाऱ्या एका परदेशी व्यक्तीबद्दल वाचले. तिथूनच त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि या कल्पनेने जामी यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले.
त्यांच्या काकांनी त्यांना पायाने लिहिण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी पायाच्या बोटांमध्ये खडू आणि पेन पकडून लिहिण्याचा सराव करून घेतला. “सततच्या सरावाने अशक्य गोष्टही शक्य होते”, ही म्हण जामी यांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. काही वर्षांच्या कठोर सरावानंतर ते पायाच्या बोटांनी अगदी सहज लिहू लागले.
त्यानंतर त्यांनी आपल्या सर्व शाळा-कॉलेजच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा स्वतःच्या पायाने लिहूनच दिल्या. त्यांनी लिहिण्यासाठी कधीही ‘रायटर’ची मदत घेतली नाही. शिक्षक भरती परीक्षेत उत्कृष्ट रँक मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांची एका सरकारी ‘ट्रायबल वेलफेअर हायस्कूल’मध्ये शिक्षक म्हणून निवड झाली. आज ते पायाच्या बोटांमध्ये खडू पकडून ब्लॅकबोर्डवर लिहून विद्यार्थ्यांना शिकवतात.
सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही जामी सिम्हाचलम यांचा प्रवास थांबलेला नाही. आता UPSC परीक्षा क्रॅक करून IAS अधिकारी बनणे हे त्यांचे पुढील ध्येय आहे. आयएएस अधिकारी बनून देश आणि समाजाची सेवा करण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे.