
marksheet
HSC Marksheet Distribution: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यंदा झालेल्या बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२६ च्या विद्यार्थ्यांना सोमवारी, २५ मे रोजी छापील गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दुपारी ३ नंतर राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी याबाबत सर्व विभागीय मंडळांना पाठवलेल्या परिपत्रकानुसार विभागीय मंडळांनी उद्या (२५ मे) रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांना गुणपत्रक, उत्तीर्ण प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र तसेच तपशीलवार गुणदर्शिका उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना या कागदपत्रांचे वाटप केले जाणार आहे.
यंदा या परीक्षेला राज्यभरातून १४ लाख ४४ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेला नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख ३३ हजार ०५८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते. यंदा त्यापैकी फक्त ८९.७९ टक्के म्हणजेच १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. विज्ञान, वाणिज्य, कला आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शाखातील विद्यार्थ्यांचा समावेश यात होता. २ रोजी ऑनलाईल निकाल जाहीर झाला होता. या निकालांनंतर आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून अधिकृत छापील गुणपत्रिका मिळणार असल्याने प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे.
अभियांत्रिकी वैद्यकीय, फार्मसी, पदवी अभ्यासक्रमासाठी तसेच विविध व्यवसायिक प्रवेश प्रक्रियेसाठी छापील गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यासाठी उद्याचा (२५ मे) दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका घेताना त्यावरील नाव, विषय, गुण आणि अन्य तपशील काळजीपूर्वक तपासून घ्यावेत, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे. २ मे रोजी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रकेच्या मूळ प्रतींशिवाय रखडलेल्या पुढील प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे. राज्य मंडळाने सर्व ९ विभागीय मंडळांना कागदपत्रे सोपवली असून उद्याचा (२५ मे) दिवस विदयार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे,