
Medical Students Stress
Medical Students Stress Study: मेडिकलच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रचंड मानसिक आणि शैक्षणिक ताणतणाव सहन करावा लागतो. यासंदर्भातील एका नवीन अभ्यासात अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. नवी दिल्लीतील एका सरकारी मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस (MBBS) विद्यार्थ्यांवर केलेल्या या संशोधनामध्ये तब्बल ७७% विद्यार्थ्यांमध्ये मध्यम ते उच्च स्वरूपाचा ताण असल्याचे आढळून आले आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची चिंता, कमी गुण मिळण्याची भीती आणि शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे न देता येण्याची भीती ही विद्यार्थ्यांच्या तणावाची प्रमुख कारणे असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
ही महत्त्वाची स्टडी ‘इंडियन हार्ट जर्नल’ (Indian Heart Journal) मध्ये प्रकाशित झाली आहे. या संशोधनामध्ये दिल्लीतील एका सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या चारही वर्षांच्या एकूण ४०६ विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले होते. ही संशोधन मोहीम १८ ते २५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांवर राबवली गेली होती.
अभ्यासानुसार, ५४.४३ टक्के विद्यार्थ्यांनी त्यांना मध्यम स्वरूपाचा ताण असल्याबद्दल सांगितले, तर २२.६६ टक्के विद्यार्थी उच्च तणावाच्या स्थितीत होते. याशिवाय, सुमारे २२.९ टक्के विद्यार्थ्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा ताण दिसून आला. म्हणजेच, तीन-चौथाईहून अधिक विद्यार्थी हे मध्यम किंवा उच्च तणावाखाली जीवन जगत आहेत.
अभ्यासात असे समोर आले की, शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याचे सततचे दडपण विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठे डोकेदुखी ठरत आहे. याशिवाय शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देता न येणे, अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळणे आणि प्रचंड मोठा सिलॅबस वेळेत पूर्ण करण्याचे टेन्शन त्यांना सातत्याने अस्वस्थ करत असते. अनेक विद्यार्थ्यांना असेही वाटते की त्यांच्या कष्टांना व मेहनतीला योग्य ती दाद किंवा ओळख मिळत नाही.
विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या वर्षांनुसार अभ्यास केला असता, एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च तणावाचे प्रमाण सर्वात जास्त म्हणजेच ३०.११ टक्के इतके नोंदवले गेले. तथापि, संशोधकांच्या मते, वेगवेगळ्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीतील फरकांमुळे असे दिसून आले असावे, त्यामुळे मेडिकलच्या संपूर्ण अभ्यासात सरसकट तणाव वाढत जातो असा सरळ निष्कर्ष यावरून काढता येत नाही. या अभ्यासात विद्यार्थ्यांच्या तणावाचा आणि ‘हार्ट रेट व्हेरिएबिलिटी’ (HRV) मधील संबंधांचाही अभ्यास करण्यात आला.
या स्टडीचे प्रमुख लेखक डॉ. मोहित गुप्ता यांच्या मते, विद्यार्थ्यांकडे केवळ ते तणावात आहेत की नाही एवढेच विचारणे कधीही पुरेसे ठरत नाही. मेडिकल शिक्षणात तणावाचे पद्धतशीर मूल्यमापन करण्यासोबतच त्यातून बाहेर पडण्याच्या आणि ताणतणाव हाताळण्याच्या धोरणांचा अभ्यासक्रमात समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षणाला अधिक सर्वसमावेशक, व्यावहारिक आणि संतुलित बनवण्यावर भर दिला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच मनोरंजनासाठी आणि इतर कलागुणांसाठी पुरेसा वाव मिळेल. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकदृष्ट्या बळकट बनवणे पुरेसे नसून त्यांना भावनिकदृष्ट्या स्थिर ठेवणेही तितकेच आवश्यक आहे, जेणेकरून गरज भासल्यास ते योग्य ती मदत घेऊ शकतील आणि तणावाचा समर्थपणे सामना करू शकतील.