
MPSC
MPSC Exam Cancelled 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आयोगाने २२ मार्च २०२६ रोजी घेतलेली औषध निरीक्षक (गट-ब) पदाची संपूर्ण भरती परीक्षा पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे रद्द केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात प्रश्नपत्रिका आधीच काही उमेदवारांपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले असून, यात आयोगातील काही वरिष्ठ अधिकारी सामील असल्याचे उघड झाल्याने मोठा गदारोळ झाला आहे.
दरम्यान, इतर परीक्षांच्या निकालानंतर परीक्षार्थींनी गुणदानातील घोळाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिका तपासणीत मोठा फेरफार झाल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.
अनेक विद्यार्थ्यांना इतर सर्व विषयांमध्ये सरासरी १०० पेक्षा जास्त किंवा उत्कृष्ट गुण मिळाले आहेत; मात्र एका विशिष्ट वैकल्पिक विषयात त्यांना अवघे २, ६ किंवा ५८ गुण देण्यात आले आहेत. एकाच परीक्षार्थीला वेगवेगळ्या विषयात इतकी टोकाची गुणदान तफावत कशी मिळू शकते, असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर आणि तज्ज्ञतेवर गंभीर संशय व्यक्त केला आहे.
Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात
या वर्णनात्मक परीक्षेतील पेपर-२ च्या गुणदानाबाबतही मोठा वाद निर्माण झाला आहे. अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत अत्यंत विस्तृत आणि तांत्रिक अभ्यासक्रम असलेल्या पेपर-२ मध्ये ७५% ते ९०% गुण मिळवणे कठीण असताना, तब्बल १३० उमेदवारांनी हा मापदंड कसा गाठला, असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच, काही विद्यार्थ्यांना पेपर-२ मध्ये जास्त गुण, तर पेपर-१ मध्ये अतिशय कमी गुण मिळाल्याने दोन्ही पेपरच्या गुणांमधील तफावत ५० पेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.
उमेदवारांच्या वाढत्या आक्षेपांवर आणि संतापावर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उमेदवारांच्या सर्व शंका जाणून घेण्यात आल्या असून प्रत्येक मुद्द्याचे निरसन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या तांत्रिक बाबींवर सध्या चर्चा सुरू असून, लवकरच उत्तरपत्रिकांच्या आक्षेपांसंदर्भात अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.