फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) मार्फत प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer – AO) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतातील नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीत नोकरीसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार १२ जून २०२५ पासून ३ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी उमेदवाराचे वय १ मे २०२५ रोजी २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयात सवलत मिळेल. या भरतीमध्ये जनरलिस्ट आणि स्पेशालिस्ट अशा दोन्ही प्रकारांत पदे आहेत. जनरलिस्ट पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ६०% गुणांसह (SC/ST साठी ५५%) आवश्यक आहे. स्पेशालिस्ट पदासाठी वैद्यकीय अधिकारी (MBBS/MD/MS), कायदेशीर अधिकारी (LLB/LLM), आर्थिक क्षेत्रातील उमेदवार (CA/ICWA किंवा B.Com/M.Com), माहिती तंत्रज्ञान अधिकारी (BE/B.Tech/MCA – IT/CS), तसेच ऑटोमोबाईल इंजिनिअर (BE/B.Tech/M.Tech – Automobile/Any Engg + 1 वर्षाचा डिप्लोमा) यांना संधी आहे.
निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे – प्राथमिक परीक्षा (Prelims), मुख्य परीक्षा (Mains) आणि मुलाखत (Interview). अंतिम निवडीनंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी NICL च्या अधिकृत संकेतस्थळावर nationalinsurance.nic.co.in ला भेट द्यावी, त्यानंतर Recruitment विभागात जाऊन ‘Apply Online for AO Recruitment 2025’ लिंकवर क्लिक करावे. नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करून अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि फी भरून अर्जाची प्रिंट घ्यावी.
या भरतीद्वारे सरकारी नोकरीसह विमा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. भरघोस वेतन, स्थिरता, तसेच करिअरमध्ये प्रगतीची संधी असलेली ही नोकरी अनेकांसाठी आदर्श ठरू शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया न घालवता लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.