फोटो सौजन्य - Social Media
AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा जमाना सुरू झाला आहे. आज शाळेच्या अभ्यासापासून ते ऑफिसच्या प्रोजेक्ट्सपर्यंत एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. जरी एआयने आपले जीवन सोपे केले असले, तरी यामुळे अनेक सेक्टर्समधील नोकऱ्यांवर धोका निर्माण झाला आहे. आता काही कंपन्यांमध्ये मानवी कामगारांची जागा एआय घेऊ लागल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे अनेक कर्मचारी आपल्या नोकरीबाबत अस्वस्थ झाले आहेत. ‘एआयमुळे नोकऱ्यांवर गदा’ ही चर्चा सध्या कॉर्पोरेट जगतात जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी आता एआयसंबंधित कोर्सेसकडे वळताना दिसतात. या बदलत्या ट्रेंडमुळे आपली नोकरी सुरक्षित आहे की नाही, हे ओळखणे गरजेचे झाले आहे.
जर तुमचे काम रिपिटेटिव्ह, नियमांवर आधारित (जसे डेटा एंट्री, बेसिक अकाउंटिंग) असेल, तर एआय ते सहज करू शकतो. मात्र क्रिएटिव्हिटी, भावनिक समज, समस्यांचे निवारण, माणूस म्हणून निर्णय घेण्याची गरज असलेल्या नोकऱ्यांमध्ये एआय अजून मागे आहे. डेटा एंट्री ऑपरेटर, टेलीकॉलर, बेसिक अकाउंटंट यांसारख्या नोकऱ्यांना एआयमुळे जास्त धोका निर्माण झाला आहे. कारण या नोकऱ्या नियमांवर आधारित आणि पुनरावृत्ती करणाऱ्या असतात, ज्या एआय सहज करू शकतो. याउलट, शिक्षक, नर्स, सर्जन आणि मॅनेजर यांसारख्या नोकऱ्यांमध्ये मानवी भावनांची समज, निर्णयक्षमता आणि संवाद कौशल्य आवश्यक असते, जे एआयला शक्य नाही, त्यामुळे अशा नोकऱ्यांना सध्या कमी धोका आहे.
World Economic Forum च्या 2023 च्या अहवालानुसार, पुढील पाच वर्षांत ८३ दशलक्ष नोकऱ्या नाहीशा होतील, पण त्याच वेळी ६९ दशलक्ष नव्या नोकऱ्या निर्माण होतील. त्यामुळे काळजी करण्याऐवजी नवीन क्षेत्रांमध्ये कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. AI डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, ग्रीन एनर्जी आणि सायबर सिक्युरिटी यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये प्रचंड संधी वाढत आहेत. या स्पर्धात्मक काळात स्वतःची तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. टेक्निकल स्किल्ससाठी Python, AI Tools आणि Data Analysis शिकावे. तसेच Communication, Adaptability आणि Problem Solving यांसारख्या सॉफ्ट स्किल्ससुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. Google AI Essentials किंवा Coursera सारख्या प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन कोर्स करून हे स्किल्स मिळवता येतील. यासोबतच इंटर्नशिप, प्रोजेक्ट्स आणि हैकाथॉनमध्ये सहभागी होऊन नेटवर्किंग वाढवणेही फायद्याचे ठरेल.
नोकरीचा धोका ओळखण्यासाठी “willrobotstakemyjob.com” या वेबसाइटवर आपले नोकरीचे टायटल टाका आणि त्याचा रिस्क स्कोअर जाणून घ्या. याशिवाय AI चा शत्रू न मानता, त्याचा योग्य वापर करून त्याला आपला सहकारी बनवा. उदाहरणार्थ, ChatGPT सारख्या टूल्सचा वापर करून रिझ्युमे बनवणे, इंटरव्ह्यूची तयारी करणे शक्य आहे. म्हणूनच, निष्कर्ष असा की एआय काही नोकऱ्या नक्कीच घेईल, पण त्याचबरोबर अनेक नवीन संधीही निर्माण करेल. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. स्वतःला अपडेट ठेवत, नवे स्किल्स शिकत आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपण यशस्वी भविष्यासाठी सज्ज राहू शकतो.