नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज! १,५८८ नियोक्ते सहभागी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी
रोजगार महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप, LIC, HDFC, ICICI, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, बॉश, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, JSW स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, CEAT आणि थर्मॅक्स यांसारख्या नामांकित कंपन्या व संस्थांचा सहभाग आहे. ऑटोमोबाईल, उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, शिक्षण, आरोग्य, लॉजिस्टिक्स आणि इतर विविध क्षेत्रांतील कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे विविध शैक्षणिक पात्रता आणि कौशल्ये असलेल्या युवकांना त्यांच्या आवडीनुसार रोजगाराच्या संधी शोधता येणार आहेत.
फ्रेशर्ससह अनुभवी उमेदवारांसाठीही रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. ITI, पदवी, HSC, डिप्लोमा, इंजिनीअरिंग आणि इतर कौशल्याधारित पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी विविध पदांवर संधी उपलब्ध आहेत. टेक्निशियन, मशीन ऑपरेटर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, ट्रेनी, अप्रेंटिस, सेल्स, ग्राहक सेवा आणि इतर पदांचा यामध्ये समावेश आहे. तसेच शासनाशी निगडित संस्थांमध्येही काम करण्याची संधी युवकांना मिळणार आहे.
रोजगार महाकुंभाला मिळत असलेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, २९ सप्टेंबरपर्यंत नोंदणीकृत नियोक्त्यांची संख्या २,५०० हून अधिक होण्याची अपेक्षा आहे. आगामी काळात आणखी कंपन्या आणि उद्योगसंस्था सहभागी होणार असल्याने युवकांसाठी उपलब्ध रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून उद्योगक्षेत्राच्या मनुष्यबळाच्या गरजा आणि युवकांची कौशल्ये यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
येत्या २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाच्या’ पूर्वतयारीचा भाग म्हणून कौशल्य विकास विभाग आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ११ सप्टेंबर रोजी वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एम्प्लॉयर राऊंड टेबल’चे आयोजन करण्यात आले होते. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून आयोजित या बैठकीत महाराष्ट्रातील ३२ नामांकित उद्योग व आस्थापनांच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. रोजगार मेळाव्यात उद्योगांचा सक्रिय सहभाग वाढवणे, त्यांच्या मनुष्यबळाच्या गरजा समजून घेणे आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींसाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे, हा या बैठकीचा उद्देश होता.






