फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Rural Education Satara News : आसरे (ता. वाई) दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा कणा असलेली वाई–आसरे एसटी बससेवा अनियमित झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. एसटी महामंडळाच्या नियोजनशून्य आणि भोंगळ कारभाराचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसत असून, बस वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेलाही मुकावे लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
आसरे येथील कमंडलू पंचकोशी माध्यमिक विद्यालयाने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन वाई आसरे एसटी बस नियमित सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. विद्यालयातील एकूण १६ विद्यार्थी एसटीने ये-जा करीत असून या सर्व विद्यार्थ्यांचे एसटी पास काढण्यात आले आहेत. याशिवाय परिसरातील नागरिक आणि अन्य विद्यार्थ्यांसाठीही एसटी बस हीच प्रमुख वाहतुकीची सोय आहे.
दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी वाई–आसरे तसेच ओहळी मार्गावरील एसटी बस न आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. नियमित परीक्षा सुरू असताना बससेवा उपलब्ध न झाल्याने संबंधित विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी एसटी महामंडळाच्या अनियमित सेवेमुळे त्यांच्या शिक्षणाच्या वाटेतच अडथळे निर्माण होत असल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे.
दुर्गम भागातील नागरिकांसाठी एसटी ही चैनीची नव्हे, तर जीवनावश्यक सेवा आहे. असे असताना दिवसातून केवळ दोन वेळा उपलब्ध असलेली एकमेव बसही नियमित धावत नसेल, तर विद्यार्थ्यांनी शाळेत जायचे कसे आणि नागरिकांनी आपली दैनंदिन कामे करायची कशी? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
ही शिक्षण संस्था मोठ्या विचाराने स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांनी स्थापन केली आहे. या संस्थेचे उद्दिष्ट सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी घडवणे आहे या संस्थेला छत्रपतीं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्या रोहिडेश्वर किल्ल्याचे नाव देण्यात या संस्थेला आले असून कमंडलू पंचकोशी माध्यमिक विद्यालयाने अत्यंत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांना घडविण्याचे काम केले आहे.
MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली! आता ‘या’ नवीन तारखेला होणार परीक्षा
या संस्थेचे चेअरमन तथा मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या कानावरही एसटी महामंडळाच्या या कारभाराची बाब घालण्यात आली असून, यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे दरम्यान, “दुर्गम भागातील जनतेला एसटी सेवा देण्यास टाळाटाळ केली जात असेल, तर हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा ग्रामस्थ सागर सणस यांनी दिला.
वाई–आसरे एसटी सेवा तातडीने आणि दररोज नियमित करण्यात आली नाही, तर नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारून रस्त्यावर उतरण्याची भूमिका घ्यावी लागेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा किंवा दुर्गम भागातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न असो, एसटी महामंडळाने आता झोपेतून जागे होऊन तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा एसटीच्या निष्काळजी कारभाराविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.






