फोटो सौजन्य - Social Media
भारतीय विद्या भवनच्या एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एसपीजेआयएमआर)ने त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन डेव्हलपमेंट मॅनेजमेंट (PGPDM) च्या २५ व्या बॅचचे (सिल्व्हर जुबली बॅच) उद्घाटन केले. या लाँचसह संस्थेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. भारतातील हा एकमेव डेव्हलपमेंट मॅनेजमेंट प्रोग्राम असून, त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर EQUIS, AACSB आणि AMBA-BGA यांच्याकडून प्रतिष्ठित ‘ट्रिपल क्राऊन’ मान्यता मिळाली आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा काम करण्याची इच्छा असलेल्या व्यावसायिकांसाठी हा कोर्स विकसित करण्यात आला असून, तो शैक्षणिक उत्कृष्टता आणि व्यावहारिक प्रशिक्षणाचे अनोखे मिश्रण प्रदान करतो.
उद्घाटन समारंभात पीजीपीडीएमचे अध्यक्ष प्रो. तनोजकुमार मेश्राम, AVPN च्या दक्षिण आशियामधील प्रादेशिक संचालक लावण्या जयराम, सिल्व्हर जुबली बॅचचे ४४ सहभागी, तसेच प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीप-प्रज्वलनाने झाली, जे ज्ञानप्राप्ती आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासाचे प्रतीक होते.
प्रो. मेश्राम विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करत म्हणाले, ”तुम्हा प्रत्येकाला भारतभरातील अनुभव व पैलूंची जाण आहे. ही विविधता तुमची ताकद आहे, ज्यामुळे अध्ययन वातावरण अधिक उत्साहपूर्ण होते आणि तुम्ही सामाजिक क्षेत्रातील गुंतागुंतीच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी सक्षम होता. या संपन्न विविधतेसह परिवर्तन घडवून आणण्याप्रती तुमची आवड या प्रोग्रामला अद्वितीय व प्रभावी बनवते.” पीजीपीडीएम बॅच २५ मध्ये ४० टक्के विद्यार्थीनी आणि ६० टक्के विद्यार्थ्यांचा सहभाग आहे, जेथे सहभागींचे सरासरी वय ३३ वर्ष असण्यासोबत कामाचा सरासरी नऊ वर्षांचा अनुभव आहे आणि ते भारतातील १६ राज्यांमधून आहेत. लावण्या जयराम सामाजिक गुंतवणूकीच्या महत्त्वाबाबत मत व्यक्त करत म्हणाल्या, ”आजच्या गुंतागुंतीच्या विश्वामध्ये सामाजिक गुंतवणूकीसाठी सहयोग अधिक महत्त्वाचे बनले आहेत. आपण भावी पिढ्यांसाठी आपले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (एसडीजी) संपादित करण्यासाठी यंत्रणा स्तरावर, तसेच कोणत्या क्षेत्रात सहयोगाने काम करण्याची आवश्यकता आहे याबाबत विचार केला पाहिजे. मी तुम्हा सर्वांना सक्रियपणे सहयोग करण्याचे आवाहन करते, ज्यामुळे प्रभावामध्ये अधिक वाढ होऊ शकते.”
२०११ पासून पीजीपीडीएम प्रोग्रामने भारतातील २६ राज्यांमध्ये ३५० हून अधिक कंपन्यांमध्ये सामाजिक बदल घडवला आहे. या कोर्सचे माजी विद्यार्थी स्वयंसेवी संस्थांचे संस्थापक, प्रमुख, संचालक, सामाजिक उद्योजक, CSR व्यवस्थापक, प्रोग्राम अधिकारी आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. हा १२ महिने चालणारा मॉड्युलर प्रोग्राम सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि धोरणात्मक दृष्टीकोन विकसित करण्यास मदत करतो. यात ६ संपर्क सत्रांमध्ये ३० अभ्यासक्रम शिकवले जातात. ऑन-कॅम्पस आणि ऑनलाइन शिकण्याच्या संकल्पनेवर आधारित हा कोर्स एसपीजेआयएमआरच्या मुंबई कॅम्पसमध्ये तीन संपर्क सत्रांसह राबवण्यात येतो.