मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा १ (२०२४-२५) या अभियानांतर्गत राज्यभरात घेण्यात आलेल्या उपक्रमामध्ये विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग (मराठी माध्यम) या शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत वसई तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. शालेय गुणवत्ता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि शासनाने दिलेल्या विविध निकषांवर शाळेने उच्च स्थान प्राप्त केले आहे. शाळेच्या उत्तम कामिगिरीमुळे शाळेची सर्वत्र चर्चा होत आहे. एकदंरीत, वसईत या चर्चेला उधाण आले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कामगिरीबद्दल तीन लाख रुपयांचा धनादेश आणि प्रशस्तीपत्र देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भक्ती वर्तक तसेच त्यांच्या सहकारी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. हा बक्षीस वितरण समारंभ दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सेंट अँथनी हायस्कूल, मालोंडे, वसई (पश्चिम) येथे पार पडला. वसई तालुक्यात प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या शाळांचे प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. अशोक पाटील (सभापती, पंचायत समिती, वसई), गटशिक्षणाधिकारी माधुरी पाटोळे, जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी तसेच वसई पंचायत समितीचे सर्व सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून उत्कर्ष विद्यालयाने तालुकास्तरीय स्तरावर आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. याबद्दल विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय हितेंद्र ठाकूर, ट्रस्टच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर यांनी सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले. तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन. पाध्ये आणि विद्यालय समन्वयक नारायण कुट्टी यांनीही शिक्षक वृंदाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ही कामगिरी उत्कर्ष विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाचे प्रतीक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण आणि सुविधा मिळण्यास मदत होईल. या यशानंतर उत्कर्ष विद्यालय भविष्यात आणखी उच्च लक्ष्य गाठेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. वसईच्या उत्कर्ष विद्यालयाच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे ही शाळा स्थानिक क्षेत्रातील एक दर्जेदार शाळा म्हणून नावारूपास येत आहे.