
फोटो सौजन्य - Social Media
जीवनात परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय स्पष्ट असेल, मेहनत प्रामाणिक असेल तर यश अटळ असतं. हे सिद्ध केलं आहे उत्तराखंडच्या सितारगंजमधील हिमांशु गुप्ता यांनी. ज्या हातांनी एकेकाळी वडिलांसोबत चहाचा ठेला चालवला, त्या हातांनी आज IAS अधिकारी म्हणून देशसेवेची जबाबदारी स्वीकारली आहे. हिमांशुंची ही कहाणी म्हणजे संघर्ष, जिद्द आणि यशाचं प्रेरणादायी उदाहरण आहे.
हिमांशु गुप्ता यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. त्यांच्या वडिलांचा चहाचा ठेला होता आणि हिमांशु स्वतः त्यांना हातभार लावत असत. पण गरीबीने त्यांचा आत्मविश्वास मोडला नाही, उलट तो अधिक दृढ झाला. शिक्षणाचं महत्त्व जाणून त्यांनी लहानपणापासून अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. शाळेत जाण्यासाठी दररोज तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता, पण त्यांनी कधी हार मानली नाही.
दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवी पूर्ण केली आणि पुढे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. याच काळात त्यांनी UPSC च्या तयारीला सुरुवात केली. आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने कोचिंगशिवाय त्यांनी सेल्फ-स्टडीच्या जोरावर अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात ते IRTS अधिकारी झाले, पण त्यांचं स्वप्न होतं IAS बनण्याचं.
दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी IPS पद मिळवलं आणि तिसऱ्या प्रयत्नात, 2020 मध्ये AIR 139 रँक मिळवत अखेर IAS बनले. त्यांचा हा प्रवास दाखवतो की परिस्थिती काहीही असो, सातत्य आणि मेहनतीमुळे अशक्यही शक्य होतं.
हिमांशु गुप्ता यांनी IPS अधिकारी शिवा सिंह यांच्याशी विवाह केला आहे. शिवा यांनी UPSC मध्ये AIR 309 मिळवत यश संपादन केलं. आज ही IAS-IPS जोडी देशभरातील तरुणांसाठी प्रेरणेचं स्रोत बनली आहे. जिद्द, कष्ट आणि चिकाटी असेल तर चहाच्या ठेल्यावरूनही प्रशासनाच्या शिखरापर्यंत पोहोचता येतं. हे हिमांशु आणि शिवा यांनी सिद्ध केलं आहे.