फोटो सौजन्य - Social Media
शिक्षक, मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे सन २०२५-२६ साठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमात राज्यातील विविध शिक्षक, मुख्याधापक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध अधिकाऱ्यांना भाग घेता येणार आहे.
शिक्षण क्षेत्रात नवनवीन कल्पना राबवणाऱ्या शिक्षकांचे तसेच सगळ्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवणे या उप्रक्रमाचा उद्देश असून असे उपक्रम आणि सुधारणा राबवणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा पाच गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या गटात पूर्वप्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या, सेविका आणि पर्यवेक्षिका यांचा समावेश आहे तर दुसऱ्या गटात प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. तिसऱ्या गटात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. चौथ्या गटात विषय सहाय्यक आणि विषय साधन व्यक्ती यांचा समावेश आहे तर पाचव्या गटात अध्यापकाचार्य, पर्यवेक्षीय अधिकारी व कर्मचारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता आणि प्राचार्य) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपल्या नवोपक्रमांचा सविस्तर अहवाल राज्यस्तरावर सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून, इच्छुकांनी दिलेल्या https://forms.gle/N1KnzaQjP4VsPn2v5 या लिंकवर जाऊन माहितीपत्रकाचे अवलोकन करून नोंदणी करावी. अर्ज सादर करण्याची मुदत ३ नोव्हेंबर पासून सुरु झाली आहे तर २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ही मुदत देण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांनी सांगितले की, “शिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या सर्जनशील कल्पनांना प्रोत्साहन देणे, शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तेचा विकास करणे आणि नव्या पद्धतींचा अवलंब करण्यास प्रेरणा देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.”






