
फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी आणि मुख्य बोर्ड परीक्षेसाठी मानसिक व शैक्षणिकदृष्ट्या सज्ज व्हावे, या उद्देशाने देवगिरी महाविद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान वर्गाच्या पूर्वपरीक्षेला सोमवार, २९ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. परीक्षा विभागाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार ही पूर्वपरीक्षा शांततेत, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.
महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी योग्य बैठक व्यवस्था, पुरेसे प्रकाशमान, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय तसेच इतर मूलभूत सुविधा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान शांतता आणि शिस्त राखली जावी, यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून परीक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना आधीच देण्यात आल्या आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या मुख्य परीक्षांचे वेळापत्रक अधिकृतरीत्या जाहीर केले असून या परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही पूर्वपरीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. या पूर्वपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळणार असून प्रश्नपत्रिकेचा अंदाज, वेळेचे नियोजन आणि तीन तास सलग बसून पेपर सोडवण्याचा सराव होणार आहे.
परीक्षा विभाग आणि शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना तणावमुक्तपणे पेपर सोडवण्याचा सल्ला दिला जात आहे. मनातील भीती दूर ठेवून, अति उत्साह किंवा घाई न करता शांतपणे प्रश्नपत्रिका वाचून उत्तरे लिहावीत, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच वेळेचे योग्य नियोजन करणे, सुरुवातीला सोपे प्रश्न सोडवणे आणि शेवटी अवघड प्रश्नांकडे वळणे, अशा सूचनाही विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून मुख्य परीक्षेसाठी ते अधिक सक्षम होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक आणि परीक्षा विभाग यांच्यातील समन्वयामुळे ही पूर्वपरीक्षा यशस्वीपणे सुरू असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. अरुण काटे यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तयारीसाठी महाविद्यालय प्रशासन कटिबद्ध असून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवी पाटील, परीक्षा विभाग प्रमुख नीलिमा वाबळे, पर्यवेक्षक डॉ. किरण पतंगे, डॉ. सीमा चौधरी, डॉ. राजन राजपूत, डॉ. संतोष भोसले, डॉ. बाळासाहेब शिंदे यांच्यासह इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.