
RUTU
UPSC Success Story Rituraj Patil: ‘स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ अभ्यास नव्हे, तर संयम आणि कष्टाची पराकाष्ठा आहे’, हे सांगली जिल्ह्यातील सोनी गावच्या ऋतुराज सतीश पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या यूपीएसई परीक्षेत ऋतुराज यांनी देशभरात १३६ वा रँक (AIR 136) मिळवून सीएपीएफ (केंद्रीय सशस्त्र पोलिस दल) मध्ये त्यांची नेमणूक झाली आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असताना, वडिलांचे छत्र लवकर हरपल्यानंतरही ऋतुराज यांनी मिळवलेल्या या यशाचे कौतुक आता संपूर्ण सांगली जिल्ह्यात आणि पंचक्रोशीत होत आहे.
ऋतुराज यांचा हा प्रवास अत्यंत खडतर होता. मात्र, कौटुंबिक पाठबळ आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. ऋतुराज यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील सोनी या त्याच्या मूळ गावी झाले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या ऋतुराज यांनी पाचवीत असतानाच ‘नवोदय परीक्षा’ उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण ‘जवाहर नवोदय विद्यालय, पलूस’ येथे पूर्ण झाले. केंद्रीय विद्यालयात शिकत असल्यामुळे त्यांना सरकारी व्यवस्थेबद्दल नेहमीच आकर्षण वाटायचे. पुढे त्यांनी कृषी अभियांत्रिकी (B.Tech Agriculture) या विषयातून आपली पदवी पूर्ण केली. हे सर्व शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना मिळाली ती शिष्यवृत्तीची साथ. त्यावरच त्यांनी हे यश मिळवत एक आदर्श निर्माण केला.
ऋतुराज यांना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. दहावीत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. अचानक ओढवलेल्या या संकटानंतर त्यांना त्यांची आई लता पाटील आणि धाकटा भाऊ राहुल पाटील यांची मोठी साथ मिळाली. या दोघांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत ऋतुराज यांना अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, ऋतुराज यांनी पुढील शिक्षण सुरु ठेवले.
“माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय माझी आई, आजी आणि धाकटा भाऊ राहुल यांना जाते. वडिलांच्या पश्चात माझ्या लहान भावाने घराची जबाबदारी सक्षमपणे पेलली, म्हणूनच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. तसेच राजकुमार पाटील यांच्यासह माझे काका-काकू आणि मित्रांचेही मला मोठे सहकार्य लाभले”, असे ऋतुराज सांगतात.
ऋतुराज यांनी २०२२ पासून खऱ्या अर्थाने यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. बी. टेक. करत असताना त्यांनी ‘ॲग्रीकल्चर’ (कृषी) हाच त्याचा यूपीएससीसाठी पर्यायी विषय (Optional Subject) म्हणून निवडला, ज्याचा त्यांना परीक्षेत मोठा फायदा झाला. अनेकदा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्लीला जाणे गरजेचे मानले जाते. मात्र, ऋतुराजने हा गैरसमज दूर केला आहे. इंटरनेटच्या युगात घरी राहूनही दर्जेदार अभ्यास करता येतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Government Employees: काम न करता दरमहा पूर्ण पगार! पण तरीही सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक ताणाव का?
निकाल जाहीर झाल्यानंतर ऋतुराज यांच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या कष्टाचे आज सार्थक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “माझा मुलगा अखेर मोठा अधिकारी झाला, याचे मनभरून समाधान आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांच्या आईने व्यक्त केली.