
सांगलीकरांनो लक्ष द्या! मतदार यादीचा 'महाप्लॅन' सुरू
जिल्हाधिकारी डॉ. घोष यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेली विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम 29 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांची माहिती अद्ययावत केली जाणार आहे. ज्या मतदारांनी अद्याप गणना फॉर्म भरलेला नाही, त्यांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशी (बीएलओ) संपर्क साधून फॉर्म भरावा. तसेच www.voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित सुविधांद्वारे नागरिकांना स्वतः आणि कुटुंबातील सदस्यांचे गणना फॉर्म ऑनलाइन भरता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत ही मोहीम वेगाने सुरू असून, शिराळा मतदारसंघात 74.03 टक्के गणना फॉर्म संकलनासह सर्वाधिक प्रगती झाली आहे. त्यापाठोपाठ खानापूर (64.69 टक्के), पलूस-कडेगाव (62.22 टक्के), जत (60.89 टक्के), तासगाव-कवठेमहांकाळ (60.58 टक्के), इस्लामपूर (57.64 टक्के), मिरज (56.27 टक्के) आणि सांगली (56.11 टक्के) या मतदारसंघांचा क्रमांक लागतो.
मतदार यादीतील प्रत्येक मतदाराची माहिती मतदान केंद्राशी अचूक जोडण्याचे मतदार नोंदींचे नकाशीकरण करण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 25 लाख 73 हजार 339 मतदारांपैकी 22 लाख 38 हजार 258 मतदारांचे नकाशीकरण पूर्ण झाले असून त्याचे प्रमाण 86.98 टक्के आहे. उर्वरित 3 लाख 35 हजार 81 मतदारांचे नकाशीकरण येत्या काही दिवसांत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. घोष यांनी सांगितले.
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेसाठी जिल्ह्यात 8 मतदार नोंदणी अधिकारी, 119 सहायक मतदार नोंदणी अधिकारी, 249 बीएलओ पर्यवेक्षक आणि 2 हजार 482 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) कार्यरत आहेत.
“विशेष सखोल पुनरीक्षण ही मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित करण्यासाठीची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रत्येक पात्र मतदाराची माहिती योग्य प्रकारे नोंदविली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या मतदारांनी अद्याप गणना फॉर्म भरलेला नाही, त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे फॉर्म भरावा किंवा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी. मतदारांनी वेळेत सहकार्य केल्यास जिल्ह्याची मतदार यादी अधिक विश्वासार्ह आणि अचूक होण्यास मोठी मदत होईल.” – डॉ. मैनाक घोष,जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी
मतदारसंघ एकूण मतदार नकाशीकरण पूर्ण टक्केवारी शिल्लक
281 – मिरज 3,49,527 2,78,655 79.72% 70,872
282 – सांगली 3,65,272 2,87,227 78.63% 78,045
283 – इस्लामपूर 2,84,367 2,50,163 87.97% 34,204
284 – शिराळा 3,08,602 2,79,107 90.44% 29,495
285 – पलूस-कडेगाव 2,92,126 2,59,279 88.76% 32,847
286 – खानापूर 3,57,200 3,26,475 91.40% 30,725
287 – तासगाव-कवठेमहांकाळ 3,18,621 2,88,775 90.63% 29,846
288 – जत 2,97,624 2,68,577 90.24% 29,047
एकूण 25,73,339 22,38,258 86.98% 3,35,081