
14 वर्षीय ऋषीकेश अकोल्यातून हरवला अन् पंढरपूरमध्ये सापडला (Photo Credit - X)
१६ दिवस उलटूनही मागमूस नव्हता
सरकारी गोडाऊन परिसरात राहणारा ऋषीकेश संतोष कनोजिया हा ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घरातून काहीही न सांगता निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी वडील संतोष कनोजिया यांनी खदान पोलीस स्टेशनला तक्रार दिली. मुलगा अल्पवयीन होता. तो मोबाईल वापरत होता, पण तो मोबाईल त्याच्यासोबत नव्हता. पालकांना कुणावरही संशय नव्हता, तसेच मुलगा हरवण्यापूर्वीच्या कोणत्याही हालचालींची माहिती पालकांकडे नव्हती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक गठीत केले. या पथकाने मुलाची शाळा, शिकवणी वर्ग, परिसर, मित्रमंडळी अशा ठिकाणची गुप्त माहिती तपासली, मात्र १६ दिवस उलटूनही काहीच मागमूस लागला नाही.
सीसीटीव्ही तपासणी ठरली निर्णायक
मुलाचे आई-वडील पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना भेटल्यानंतर एसडीपीओ सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपासाची दिशा बदलली. पथकाद्वारे १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी वेगवेगळ्या पद्धतीने सुरू केली आणि हेच तपासामध्ये निर्णायक ठरले. खदान पथकाने तपासलेल्या सीसीटीव्हीमधून ११ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता ऋषीकेश हा अकोला रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ११४०३ नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये चढताना दिसला.
७ जिल्ह्यांमध्ये १५०० किलोमीटरचा प्रवास
सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीनंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार १ अधिकारी व १० अंमलदारांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. या पथकाने नागपूर-कोल्हापूर मार्गावरील वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा, परळी वैजनाथ, लातूर, धाराशिव, सोलापूर या ७ जिल्ह्यांमधील सर्व सीसीटीव्ही तपासले. तब्बल १५०० किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूर स्टेशनवरील एका कॅमेऱ्यात ऋषीकेश उतरतानाचा क्षण रेकॉर्ड झाला. त्यानंतर संपूर्ण पथक पंढरपूरमध्ये उतरले आणि मंदिर परिसरात शोध मोहीम राबवली.
२१ दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश
कोणताही पुरावा नाही, साक्षीदार नाही, मुलाकडे मोबाईल नाही आणि पालकांकडे स्पष्ट माहिती नाही, अशा परिस्थितीतही २० हून अधिक अंमलदारांच्या २१ दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश आले. मुलाला सुखरूप अकोल्यात आणून त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईत पोलीस अधीक्षक अचिंत चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, एसडीपीओ सुदर्शन पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी शंकर शेळके, मनोज केदारे, पुरुषोत्तम ठाकरे, गोपाल जाधव आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.