पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, ए व बी अशा दोन टीम नाना पेठ परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याबाबत आता पोलिसांकडून खात्री केली जात असून, ही माहिती प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या त्या १३ जणांकडून मिळाली आहे. त्यावरून पोलिसांनी संबंधित परिसरातले सीसीटीव्ही तपासण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, वनराज यांची बहिण संजीवनी, खूनाचा मास्टर माईंड सोमनाथ गायकवाड यांच्यासह ५ जणांच्या पोलीस कोठडीत १२ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
बहिण संजीवनी जयंत कोमकर (वय ३७, रा. नाना पेठ, डोके तालीमजवळ), बहिणीचा दिर प्रकाश लक्ष्मण कोमकर (वय ५१) आणि सोमनाथ सयाजी गायकवाड (वय ४१, धनकवडी, मुळ. नाना पेठ), गणेश लक्ष्मण कोमकर (वय ३७) व जयंत लक्ष्मण कोमकर (वय ५२) यांच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे.
गेल्या रविवारी (दि. १ सप्टेंबर) वनराज यांचा गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून केला. दोन गोळ्या आणि कोयत्याचे २४ वार केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपींनी वनराज यांचा खून करण्यासाठी हायटेक प्लॅनिंग केल्याची माहितीही समोर येऊ लागली आहे. दोन वेगवेगळ्या टीम वनराज यांच्या खूनासाठी तयार होत्या अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. प्रत्यक्ष हल्ला करणारी टीम ही ‘ए’ टीम म्हणून होती. घटनास्थळावर हल्ला झाला किंवा दोन्ही गट समोरासमोर आले तर त्यासाठी ‘बी’टीम आरोपींनी याच परिसरात उभा केली असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आता या बी टीमचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासून नेमके ही टीम कोण व त्यात कोण-कोण सहभागी होते, याचा तपास सुरू केला आहे. मात्र, आरोपी खोटीही माहिती देत असावे सांगितले जाते.
पोलिसांनी आरोपींना मदत केल्यावरून वनराज यांची बहिण संजीवनी मेव्हणा जयंत तसेच दिर अशा पाच जणांना तत्काळ अटक केली होती. त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत कोठडीचे आदेश दिले होते. त्यांचे कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.