
पुणे शहरातील बड्या व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल 104 कोटींना घातला गंडा
याप्रकरणी वाघोली पोलिसांनी बारामतीमधील एका व्यावसायिकासह त्याच्या कुटुंबीयांवर फसवणूक तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. याबाबत पशुखाद्य, दूधसंकलन क्षेत्रातील ४६ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे.
तक्रारदार व्यावसायिक खराडीत राहतात. आरोपींनी दहा बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. कंपन्यांत गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. तक्रारदारांची आरोपींशी व्यावसायाच्या निमित्ताने २०२२ मध्ये ओळख झाली होती. आरोपींनी त्यांना गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले. गुंतवणुकीवर १५ टक्के परतावा देऊ असेही सांगण्यात आले होते. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर तक्रारदारांकडून वेळोवेळी १०४ कोटी २४ लाख ११ हजार रुपये घेतले. गुंतवणूक केल्यानंतर व्यावसायिकाला परतावा दिला नाही. परताव्याबाबत विचारणा सुरू केल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपी हे बारामतीतील जळोची भागात वास्तव्यास असल्याची माहिती देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : गुटखा तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या; चारचाकी वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त