टाटा मीठाच्या नावाने बनावट मिठाची विक्री; किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल
पुणे : टाटा मीठाच्या नावाने बनावट मिठाची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला असून, कॉपीराईट कायद्याचा भंग करुन मीठाची विक्री करणार्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर परिसरातील एका दुकानदाराने हा बनावट कारनामा केला आहे. या प्रकरणी साजीद असगरअली अन्सारी (वय ३४, रा. स्पाईन रोड, भोसरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हिराराम गंगाराम चौधरी (वय २६, रा. सोलापूर रोड, हडपसर) आणि नरेंद्रसिंग याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हडपसरमधील विठ्ठल मंदिराशेजारील बालाजी ट्रेडर्स या दुकानात रविवारी दुपारी साडेबारा वाजता कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांना हडपसरमध्ये टाटा नमकच्या नावाने दुसरे मीठ विकले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पाहणी केली असता बालाजी ट्रेडर्स या दुकानातून भेसळयुक्त टाटा नमकची विक्री केली जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी बालाजी ट्रेडर्स या दुकानावर छापा घातला. तेव्हा तेथे २० पोत्यांमध्ये टाटा नमक (मीठ) चे ६०० एक किलो चे पुडे आढळून आले. पोत्यामधील मिठाचे पाकिटावरील कव्हर व त्याचे अक्षराचे फॉन्ट पूर्णपणे वेगळे दिसून आले.
तसेच त्याच्यावर बॅच नंबर नव्हते. किंमतीमध्ये देखील फरक दिसून आला. पाकिटे पूर्णपणे कॉपीराईटचा भंग करुन बनविली असल्याचे दिसून आले. त्याची विक्री करुन कॉपीराईटचे हक्काचे उल्लंघन करीत असताना दुकानदार मिळून आला. याबाबत चौधरीकडे चौकशी केल्यावर त्याने नरेंद्रसिंग याच्याकडून ही पाकिटे घेतल्याचे सांगितले. सहायक निरीक्षक सुशिल लोणकर अधिक तपास करीत आहेत.
सायबर चोरट्यांकडून सातत्याने फसवणूक
पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. सायबर चोरट्यांकडून सातत्याने फसवणूकीचे सत्र सुरू असून, दोन महिलांची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दिली आहे.
सायबर चोरट्यांनी तक्रारदारांना शेअर बाजारात गुंतवणूकीचे आमिष दाखविले. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल,असे सांगितले. चांगला परतावा मिळेल या आमिषाने महिलेने चोरट्यांनी सांगितल्यानुसार वेळोवेळी २६ लाख २५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा मिळाला, असे भासविले. महिलेने परताव्याबाबत विचारण केली. तेव्हा चोरट्यांनी मोबाईल बंद केले. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.