
पुण्यात बंडू आंदेकरच्या वकिलांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार मयुर भोकरे व हवालदार अमोल आवाड यांना माहिती मिळाली होती की, बंडु आंदेकर टोळीशी संपर्कात असलेल्या तन्मय गणेश कांबळे (रा. नाना पेठ, राजेवाडी) याच्याकडे पिस्तुल असून, ते त्याने लपवून ठेवलेले आहे. आंदेकर टोळीतील इतर साथीदारांसोबत मिळून काहीतरी गुन्हा करण्याच्या तयारीत आहे. पोलिसांनी तन्मयला पकडले. त्याने हे पिस्तुल अल्पवयीन मुलाकडे ठेवायला दिले असल्याचे सांगितले. त्यानुसार बंडु आंदेकर याचा नातू स्वराज वाडेकर याच्या ‘हीच आईची इच्छा’ या चार मजली इमारतीत घरझडती सुरु केली होती. पोलिसांनी ८० हजार रुपयांचे २ देशी बनावटीचे पिस्टल, एक एअर गन, १७ लाख १५ हजार २६० रुपयांची रोकड, १८ लाख ८४ हजार ३८९ रुपयांच्या चांदीच्या वस्तु आणि ५७ हजार ५०० रुपयांच्या इतर वस्तु असा ३७ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त केला.
याच इमारतीतील भाडेकरु प्रभु मारुती लोकरे यांच्या घराची झडती घेण्यात येत होती. त्याचे पंचासमक्ष ई साक्षद्वारे व व्हिडिओ शुटींग केले जात होते. त्यावेळी दोघे अचानक आले आणि ‘बंडु आंदेकर आमचे अशील असून, तुम्ही पलीकडच्या लेडीजच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये घुसला आहात, असे म्हणायला लागले. तेव्हा पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप यांनी त्यांना ही कारवाई कायदेशीर असून, आम्हाला आमचे काम करु द्या, असे समजावून सांगितले. तेव्हा त्या वकिलांनी ‘‘कारवाई चुकीची असून बोलायचे नाही, सी आर दाखल आहे का? हाऊस सर्चची परमिशन आहे का? कशी काय कारवाई करु शकता’’ अशा प्रकारे पोलिसांनाच दमदाटी केली. वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते तपास करीत आहेत.