
चंद्रपुरातील किडनी प्रकरण समोर येताच सरकारकडून मोठी कारवाई; पाच सावकारांना अटक
चंद्रपूर : शेतनागभीड तालुक्यातील सावकारी कर्जची परतफेड करण्यासाठी किडनी विकल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. हे प्रकरण समोर येताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात सहा सावकारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. तर या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली.
किशोर रामभाऊ बावनकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे, प्रदीप रामभाऊ बावनकुळे, संजय विठोबा बल्लारपुरे आणि सत्यवान रामरतन बोरकर अशी अटकेतील आरोपी सावकारांची नावे आहेत. तर मनिष पुरुषोत्तम घाटबांधे हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन शिवदास कुडे यांनी ब्रम्हपुरी येथील दोन सावकारांकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यापैकी ८५ हजार रुपये वेळेत न भरल्याने एका सावकाराने २० टक्के दराने व्याज व दररोज ५ हजार रुपये दंड आकारण्याची धमकी दिली.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! सावकारी तगाद्यापायी शेतकऱ्याने विकली किडनी; एक लाखाचे कर्ज गेले 74 लाखांवर
दरम्यान, नागभीड तालुक्यातील मिंथूर शेतकरी रोशन कुडे यांनी कर्जाच्या जाचामुळे कंबोडियात जाऊन किडनी विक्रीबाबत कोणताही स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. या संदर्भात वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट?
कर्जफेडीसाठीच किडनी विकली का?, कंबोडियात जाण्याची माहिती कुडे यांना कोणी दिली?, प्रवास व वैद्यकीय प्रक्रियेची व्यवस्था कोणी केली?, तसेच या संपूर्ण व्यवहारामागे कोण सक्रिय होते?, याची सखोल चौकशी केली जाणार आहे. यामागे मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डांबून ठेवून मारहाण
२०२१ ते जून २०२३ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून अव्वाच्या सव्वा व्याजाची वसुली केली. वसुलीसाठी रोशनला डांबून ठेवून अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली व गंभीर दुखापत करण्यात आली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एक लाखाचे कर्ज 74 लाखांवर…
शेतकऱ्यांना अनेक प्रश्न भेडसावत असतात. शेतीसाठी बँका अथवा खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले जाते. मात्र, त्याची परतफेड करता आली नाहीतर अनेक अडचणी येतात. अशीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्याने चक्क स्वत:ची किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार नागभीड तालुक्यातील मिंथूर येथे घडला. एक लाखाचे कर्ज 74 लाखांवर पोहोचले असून, किडनी विकूनही कर्जाची परतफेड मात्र झाली नसल्याचेही उघडकीस आले आहे.